सोलापूर / प्रतिनिधी
मोहोळ तालुका सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्वयंखुद्द योजनेसंदर्भात फेरचौकशीसाठी पाठविण्याचा आदेश पुणे येथील धर्मादाय सहआयुक्त सुधीर बुक्के यांनी दिला. सोलापूर येथील तत्कालीन धर्मादाय उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी शाहीन शेख या गटाच्या तथाकथित सभासदांमध्ये निवडणूक घेऊन प्रथम विश्वस्त मंडळ निवडण्याबाबतचा दिलेला निर्णय प्रदीर्घ सुनावणीनंतर धर्मादाय सहआयुक्त सुधीर बुक्के यांनी रद्द केला, अशी माहिती संस्थेचे विश्वस्त पांडुरंग सुरवसे यांनी पत्रकार परिषदेत दिली, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती
जी.एस. पटेल यांनी सदर संस्थेचा व संस्थेअंतर्गत चालणाऱ्या नागनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा ताबा व कारभार मुख्य जिल्हा न्यायाधीश-सोलापूर यांच्याकडे देण्याचा आदेश दिला होता.
तालुक्यातील शिक्षणाचा खेळखंडोबा करणाऱ्या, संस्थेत बेकायदेशीर घुसखोरी करून संस्थेची मोठ्या प्रमाणात असलेली जमीन व रक्कम हडप करण्याचा हेतू असलेल्या, शाळा आपली खासगी मालमत्ता समजणाऱ्या शेख कुटुबियांचा, स्वयंघोषित व तोतया संस्थाचालक शाहीन शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा बुरखा यानिमित्ताने फाटला गेला, असेही त्यांनी सांगितले.
न्यायमूर्ती जी.एस. पटेल यांनी सदर संस्थेचे प्रलंबित बदल अर्ज व प्रलंबित स्वयंखुद्द योजना तपासून यावर अहवाल पाठवण्याचे आदेश सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांना दिले होते. परंतु तत्कालीन धर्मादाय उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी संस्थेच्या घटनात्मक तरतुदी धाब्यावर बसवून शाहीन शेख व त्यांच्या वडिलांनी दाखल केलेले बोगस व बनावट बदल अर्ज कोणत्याही पुराव्याच्या आधाराशिवाय, पूर्व परिस्थितीची पडताळणी न करता मान्य केले व स्वयंखुद्द योजनेमध्ये स्वतःच दिलेल्या आदेशाला छेद देऊन मुलाखत घेऊन विश्वस्त निवडण्याऐवजी शाहीन शेख गटाच्या तथाकथित सभासद रजिस्टरमधील लोकांमधून निवडणूकद्वारे निवडण्याचे आदेश केले.