कळंब : प्रतिनिधी
कळंब एसटी आगारातील कर्मचारी सच्चिदानंद पुरी हे एसटी कर्मचा-यांच्या विविध प्रलंबित मागणीसाठी बीएसएनएलच्या टॉवरवर गळफास लावून चढले. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचा व्हिडिओ बनवून आत्मकलेश करत असल्याची लिहिलेली पोस्ट केली आहे.
एसटी कर्मचा-यांच्या न्याय हक्कासाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनामध्ये आमदार गोपीचंद पडळकर, आ. सदाभाऊ खोत या नेत्यांनी फसवल असल्याचा व्हिडिओ बनवला आहे.
यामध्ये त्यांनी मित्रांनो मी सच्चिदानंद पुरी गळफास लावून आत्मक्लेश आंदोलन करत आहे. न्याय नाही मिळाला तर सच्चिदानंद पुरी आज आत्मदहन करणार. मी एसटी कर्मचा-यांना न्याय मिळवण देवू शकलो नाही म्हणून हे पाऊल उचलतोय. माझ्या जीवाचे बर-वाईट झाल्यास कोणीही श्रध्दांजली अर्पण करू नये, अशी पोस्ट टाकुन आंदोलन चालु केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
यापूर्वी ही सच्चिदानंद पुरी यांनी एसटी कर्मचा-यांच्या विविध मागणीसाठी याच पद्धतीने आंदोलन केले होते. या अनोख्या आंदोलनस्थळी पोलीस तसेच एसटी कर्मचारी चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु टॉवरच्या वरच्या बाजुला पुरी बसल्याने त्यांचा आवाजही खाली येत नाही. या ठिकाणी पोलिसाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.