धाराशिव : शहरातील छत्रपती शिवाजी चौकातून महात्मा गांधी नगरकडे पायी जाणा-या ५७ वर्षीय व्यक्तीला एसटी बसने धडक दिली. या झालेल्या अपघातात त्या व्यक्तीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हा अपघात १० मार्च रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात बसचालकाच्या विरोधात १४ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, महात्मा गांधी नगर, धाराशिव येथील युसूफ ईस्माईल कुरेशी, वय ५७ वर्षे, हे दि.१० मार्च रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास धाराशिव येथे शिवाजी चौकामधुन पायी महात्मा गांधी नगर येथे जात होते. दरम्यान बस क्र एमएच २०बी. एल. १६६२ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील बस ही निष्काळजीपणे
चालवल्याने युसूफ कुरेशी यांना धडक दिल्याने युसूफ हे गंभीर जखमी झाले.
उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयताचा मुलगा मोहसीन युसूफ कुरेशी यांनी दि. १४ मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम (अ), अंतर्गत धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.