उस्मानाबाद : प्रतिनिधी
मार्चअखेर पर्यंत सततच्या पावसाचे अनुदान शेतक-यांना वितरीत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी सभागृहात ग्वाही दिली आहे. अशी माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
माहे सप्टेंबर व ऑक्टोबर २०२२ मध्ये राज्यातील अनेक भागात सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी शेतक-यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण निकषाच्या पुढे जावून भरीव अनुदान वितरीत करण्यात आले होते. मात्र सप्टेंबर व ऑक्टोबर मधील अनुदान प्रलंबित आहे. सदरील अनुदान मार्च अखेर शेतक-यांना वितरीत करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (दि.28) सभागृहात सांगितले. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील १ लाख ९९ हजार ९०७ शेतक-यांचे १ लाख ६३ हजार ६९८.४६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीच्या अनुदानापोटी जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारकडे २२२.७३ कोटीची मागणी करण्यात आली होती. राज्यासाठी ३२०० कोटी पेक्षा अधिकची रक्कम यासाठी लागणार असून मार्च अखेर पर्यंत निधी उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्री यांनी सभागृहाला आश्वस्थ केले.
सदरील रक्कम लवकरात लवकर शेतक-यांना वितरीत करावी, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सूरु होता. मार्च महिन्यातच ही मदत मिळणार असल्याने शेतक-यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.