22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeउस्मानाबादयेडशी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस

येडशी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस

एकमत ऑनलाईन

येडशी : उस्मानाबाद तालुक्यातील येडशी व परिसरात शनिवारी (दि.३०)दुपारी साडेतीन ते पाच या वेळेत तब्बल दिडतास ढगफुटीसारखा पाऊस झाला. या पावसामुळे येडशी शिवारात सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. येडशी गावातून जाणारा बार्शी-लातूर रस्ता पाण्याखाली गेला आहे. या रस्त्यावरून कंबरे इतके पाणी वाहत आहे. परिसरात झालेल्या पावसाचे पाणी तेरणा नदीला जात असल्याने तेरणा नदी दुथडी भरून वाहत आहे.

येडशी परिसरात दुपारी ढग दाटून आले होते. साडेतीन वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरूवात झाली. हा पाऊस पाच वाजेपर्यंत विनाथांबा सुरूच होता. तब्बल दिड तास पडलेल्या पावसाने येडशी शिवारात सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. गेल्या अनेक वर्षात पडलेला शनिवारचा पाऊस सर्वात मोठा असल्याचे नागरिक सांगत आहेत. येडशी गावातून जाणारा बार्शी-लातूर रस्त्यावरून कंबरे इतके पाणी वाहत होते. रामलिंग देवस्थानकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला होता. रामलिंग देवस्थान येथील धबधब्यापासून जाणार्‍या नाल्याला पूर आला होता. त्यामुळे धबधबा येथे अडकलेले नागरिक दोरी बांधून काढण्यात आले. येडशी गावातील सर्वच रस्त्यावरून पाणी वाहत होते.

या पावसामुळे येडशी परिसरातील काही भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. गावातील मुख्य रस्त्यावर जमादार बाबा दर्गाहपासून ते मारुती मंदिरापर्यंत पाणी वाहत होते. लातूर रोडवर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्ता काही वेळ बंद करण्यात आला होता. या पावसामुळे अनेक व्यापार्‍यांच्या दुकानात पाणी गेल्याने बाजारपेठ काहीकाळ ठप्प झाली होती. येडशी परिसरात अचानक ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने परिसरातील नदी, नाले, ओढ्यांना पूर आला आहे. शिवारात सगळीकडे पाणी साचल्याचे दिसत आहे.

येडशी शिवारातून जाणारी तेरणा नदी शनिवारी पडलेल्या पावसामुळे अचानक दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान, शनिवारी झालेला मुसळधार पाऊस फक्त येडशी परिसरात झाला. हा पाऊस ढोकी, तेर या परिसरात अवघा २० मिनीटे झाला तोही हलका पाऊस होता. येडशी परिसरात झालेल्या पावसाने तेरणा नदी दुथडी भरून वाहत असल्याने तेरणा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. लाटा आल्यानंतर तेरणाच्या सांडव्यावरून पाणी पडू लागले आहे. रविवारी सकाळपर्यंत तेरणा धरण १०० टक्के भरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या