उस्मानाबाद ः लोहारा तालुक्यातील खेड शिवारात सरबांधावर मोजणीसाठी गेलेल्या महसूल मंडळ अधिकार्यांच्या पथकावर शेतकर्यांनी हल्ला करून दगडफेक केली. ही घटना 16 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात 7 जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहारा महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी शहाजी व्यंकटराव साळुंके हे 16 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास खेड शिवारात सरबांधावर मोजणीसाठी गेले होते. खेड येथे सर्वे नं. 108 व 111 सरबांधावर मोजणेसाठी गेले असता यावेळी अमोल कडबाने, व्यंकट कडबाने, सरिता कडबाने, किशोर गाव्हाळे, अन्य 3 जणांनी मंडळ अधिकारी व सरकारी कर्मचारी यांच्याशी हुज्जत घालून, अरेरावीची, असभ्य भाषा करुन वाद घातला. गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करुन रस्ता मोजणी पथकावर दगड फेक केली. तसेच शासकीय कामात अडथळा केला. या प्रकरणी मंडळ अधिकारी साळुंके यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 332, 336, 323, 143, 504 अंतर्गत लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.