25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeउस्मानाबादउस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांना २०२० सालचा पिकविमा देण्याचे सुप्रिम कोर्टाचे आदेश

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांना २०२० सालचा पिकविमा देण्याचे सुप्रिम कोर्टाचे आदेश

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांना खरीप हंगाम २०२० मधील पिकविमा ३ आठवड्याच्या आत द्यावा, असा आदेश सोमवारी दि. ५ सप्टेंबर रोजी सुप्रिम कोर्टाने बजाज अलियांस या खाजगी विमा कंपनीला दिला आहे. यापूर्वी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बजाज कंपनीला शेतकर्‍यांना पिकविमा देण्याचे आदेश दिले होते. परंतू विमा कंपनीने या आदेशाच्या विरोधात अपील करून सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या निर्णयामुळे अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

खरीप हंगाम २०२० मध्ये परतीच्या पावसाने व अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे केले होते. राज्य सरकारने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देखील दिली होती. परंतु बजाज अलियांझ या खाजगी पिकविमा कंपनीने शेतकर्‍यांना पिकविमा देण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी भाजपा आ. राणाजगजितसिंह पाटील व शिवसेना आ. ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करून पिकविमा देण्याची मागणी केली होती.

उच्च न्यायालयात सुनावणीअंती न्यायालयाने ६ आठवड्याच्या आत शेतकर्‍यांना पिकविम्याची रक्कम देण्याचे आदेश बजाज कंपनीला दिले होते. या आदेशाच्या विरोधात विमा कंपनीने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. सर्वोच्च न्यायालयाने २०० कोटी रूपये रक्कम विमा कंपनीकडून न्यायालयात भरून घेतल्यानंतर सुनावणीस हे प्रकरण घेतले. सोमवारी दि. ५ सप्टेंबर रोजी न्यायालयात विमाप्रश्नी सुनावणी झाली. 3 आठवड्याच्या शेतकर्‍यांना २०२० मधील पिकविमा शेतकर्‍यांना द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

भाजप कार्यकर्त्यांचा उस्मानाबादेत जल्लोष
भाजप आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली पिकविमा प्रश्नी लढलेल्या न्यायालयीन लढ्यास यश आल्याने उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष केला. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, सतीश देशमुख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या