उस्मानाबाद : एटीएम केंद्रातून पैसे काढता येत नसल्याने एका व्यक्तीने दुस-या व्यक्तीची मदत घेतली. यावेळी अनोळखी व्यक्तीने एटीएम कार्डची अदलाबदल करून सदर व्यक्तीच्या खात्यातून ४० हजार रूपये लंपास केले. ही घटना तुळजापूर येथील एटीएम केंद्रात घडली.
तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी येथील विलास श्रीरंग पाखरे (वय ५२) हे १२ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तुळजापूर येथील एसबीआय बँकेच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना पैसे काढता येत नसल्याने त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या एका अनोळखी व्यक्तीची मदत घेतली. दरम्यान, त्या व्यक्तीने पाखरे यांना पैसे काढून दिले. परंतु, दरम्यानच्या काळात पाखरे यांनी डेबीटकार्डचा टाकलेला पिन सदर अनोळखी व्यक्तीने चोरून पाहिला.
त्यानंतर पाखरे यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या डेबीटकार्डच्या रंगसंगतीचे दुसरे डेबीटकार्ड पाखरे यांना दिले. काही कालावधीनंतर त्या अनोळखी व्यक्तीने पाखरे यांच्या डेबीटकार्डद्वारे बँक खात्यातील ४० हजार रूपये रक्कम काढून घेऊन पाखरे यांची फसवणूक केली. याप्रकरणी विलास पाखरे यांनी १४ डिसेंबर रोजी तुळजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून भादंवि कलम ४२० अंतर्गत अनोळखी व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.