24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeउस्मानाबादबालकाच्या नरबळी प्रकरणी ६ जणांना जन्मठेपेची शिक्षा

बालकाच्या नरबळी प्रकरणी ६ जणांना जन्मठेपेची शिक्षा

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : कळंब तालूक्यातील पिंपळगाव (डो) येथील सहा वर्षाच्या कृष्णा गोरोबा इंगोले याचा नरबळी घेतल्याची घटना जानेवारी २०१७ मध्ये घडली होती. याप्रकरणी सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. सत्र न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांनी शुक्रवारी (दि.२३) ही शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे मयत चिमुकल्याची सख्खी आत्या, चुलता, चुलती, आजोबा यांनी पुणे येथील मांत्रिकाच्या सांगण्यावरुन हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे.

यासबंधी अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. सचिन सुर्यवंशी यानी दिलेली माहिती अशी की, २६ जानेवारी २०१७ रोजी मयत कृष्णा हा शाळेतून प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपवून त्यांचे पिंपळगाव (डो) येथील वस्तीवरील घरी दुपारी बारा वाजता आला. घरी आई नसल्याने तो घराबाहेर खेळत होता. मात्र नंतर तो अचानक गायब झाला. दिवसभर शोधूनही तो मिळुन आला नसल्याने शेवटी २६ जानेवारी २०१७ रोजी मयत कृष्णाची आई सारीका इंगोले यांनी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवुन नेल्याची तक्रार दिली होती.

दुस-याच दिवशी म्हणजे २७ जानेवारी २०१७ रोजी सकाळी अकराच्या सुमारास शेतामध्ये कृष्णाचा मृतदेह सापडला होता. याचा तपास कळंब पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक डी. डी. बनसोडे यांनी केला. त्यानंतर हा तपास पोलीस निरिक्षक सुनिल नेवसे यानी केला. याप्रकरणी केलेल्या तपासात मयत कृष्णाची सख्खी आत्या द्रोपदी पौळ हीने त्याला बोलावून घेतल्याचे समोर आले. त्याला आरोपी उत्तम इंगोले यांच्या घराच्या मागील सामाईक विहीरीवर दाट झाडीत घेऊन गेली. त्याच ठिकाणी आरोपी द्रोपदी हिने इतर आरोपीच्या मदतीने कृष्णाचा खून करुन नरबळी दिल्याचे उघड झाले. आरोपी उत्तम इंगोले यांची मयत चुलत बहिण कडुबाई तसेच आरोपी साहेबराव इंगोले यांची मयत पत्नी यांच्या आत्म्याला शांती मिळावी, त्याचा आत्मा भटकू नये असे कारण देण्यात आले आहे.

आरोपीच्या घरात शांतता नव्हती, आरोपी द्रोपदी हिच्या मुलीचे दोन पती मयत झाले होते. एका मुलीची मुले जगत नव्हते, मयत कडुबाईचा व साहेबरावच्या पत्नीचा आत्मा भटकत असल्याने हे सर्व होत आहे. त्यासाठी रक्ताच्या नात्यातील मुलाचा नरबळी द्यावा लागेल असे पुणे येथील मांत्रीक आरोपी राहुल उर्फ लखन चुडावकर व सुवर्णा भाडके यांनी बाकीच्या आरोपींना सल्ला दिला. घटनेच्या आधीपासुन आरोपी उत्तम व पत्नी उर्मीला हे सर्व कुटुंबासह पुणे वास्तव्यास होते. त्या ठिकाणी मांत्रीक आरोपीची ओळख झाली होती. सर्व आरोपी पिंपळगाव येथे अमावस्या, पोर्णीमेला पूजा करण्यासाठी येते असत. घटनेच्या अगोदर पंधरा दिवसांपूर्वी पिंपळगाव येथे येऊन आरोपीनी कट कारस्थान करुन कृष्णा याचा नरबळी देण्याची योजना बनविली. त्यासाठी त्यानी आरोपी उत्तमच्या घराशेजारी खड्डा खोदून त्याठिकाणी मयत कडुबाईची समाधी बांधण्याचा मनोदय व्यक्त केला.

या प्रकरणात आरोपी व मयत यांना एकत्र पाहणारा साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, आरोपीच्या मोबाईलचे रेकॉर्डींग व टॉवर लोकेशन, कराड येथील मुर्तीकार, समाधीचे बांधकाम घेणारा गुत्तेदार, आरोपी लखनचा मित्र यांची साक्ष महत्वुपुर्ण ठरले. या प्रकरणातील काही महत्वाचे साक्षीदार फितुर झालेले होते. गुन्हा पाहणारा कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासात निष्पन्न झाला नव्हता. मात्र कृष्णाच्या मृत्युपुर्वी व मृत्युनंतर घडलेल्या छोट्या-छोट्या घटनाची साखळी परिस्थितीजन्य पुरावा पुर्ण करण्यात सरकारी पक्षाला यश आले. अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. सचिन सुर्यवंशी यांचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरुन आरोपीना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी घरोघरी जाऊन शिक्षण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या