अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री खंडोबा मंदिरातील श्रींचे सिंहासन (मखर) चांदीने मडवण्यात आले आहे. त्यासाठी ६१ किलो चांदी लागली आहे. नाशिकच्या कारागिरांनी अवघ्या २१ दिवसात हे काम पूर्ण केले आहे.
अणदूर येथील श्री खंडोबा मंदिर पुरातन असून श्री खंडोबा – बाणाई विवाह स्थळामुळे हे स्थान महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या तीन राज्यात प्रसिद्ध आहे.
छत्रपती शाहू महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा सभामंडप बांधण्याचा उल्लेख येथे आढळतो. या मंदिरातील सिंहासन पूर्वी पितळी होते, त्याची झीज झाल्यामुळे ते बदलण्यात आले. लातूरच्या कारागिराकडून हे सिंहासन सागवानी करून त्याला ६१ किलो चांदीने झळाळी देण्यात आली.
नाशिकचे कारागीर परेश कुलकर्णी व त्यांच्या पाच साथीदारांनी अवघ्या २१ दिवसांत हे काम पूर्ण केले, त्याचे रविवारी (दि.२४ जुलै) लोकार्पण करण्यात आले. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष बालाजी मोकाशे, उपाध्यक्ष अविनाश मोकाशे, सदस्य शशिकांत मोकाशे, दिपक मोकाशे, महादेव मोकाशे, अमोल मोकाशे, सदानंद येळकोटे, दिवाकर मोकाशे, श्री खंडोबा फार्मिंग सोसायटीचे चेअरमन सुदर्शन मोकाशे आदी उपस्थित होते. भाविकांनी आजवर दिलेल्या चांदीचा या कामी उपयोग करण्यात आला. तसेच भाविकांनी देणगी दिल्यामुळे हे काम पूर्ण होऊ शकले, अशी प्रतिक्रिया मंदिर समितीचे सचिव सुनिल ढेपे यांनी दिली. लवकरच मंदिराचा गाभारा दरवाजा आणि म्हाळसादेवी, हेगडीप्रधान यांचे प्रभावळ देखील चांदीने मडवण्यात येणार असल्याचे ढेपे म्हणाले.