24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeउस्मानाबादउस्मानाबादेत वाहने अडवून लुटमार करणारी टोळी पकडली

उस्मानाबादेत वाहने अडवून लुटमार करणारी टोळी पकडली

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहने आडवून लुटमार करणारी सहा जणांची टोळी पोलीस मुख्यालयातील पथकाने सोमवारी दि. ५ सप्टेंबर रोजी छापा टाकून पकडली आहे. त्यांच्या ताब्यातून २ आयशर टेम्पो, १ ट्रक, २ दुचाकीसह रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. आरोपींना वाशी पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले, अशी माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलीस अधीक्षक कार्यालयात सोमवारी दि. ५ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी माहिती दिली. अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक रामेश्वर खनाळ, वाशी ठाण्याचे पोलीस निरिक्षक उपस्थित होते. पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाले की, सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर उस्मानाबाद जिल्ह्याच्या हद्दीत वाहने आडवून लुटमार करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. ३ सप्टेंबर रोजी चालक सय्यद सज्जाद पाशा यांचा ट्रक सरमकुंडी जवळ या टोळीने थांबवला होता.

समोर आरटीओ पोलीस आहेत, ते दंड करीत आहेत, थोडावेळ थांबून जावा, असे म्हणाल्याने व समोर दोन ट्रक थांबल्याने त्यांनी त्यांचा ट्रक रस्त्याच्या बाजूला घेतला. यावेळी या टोळीतील लोकांनी सय्यद पाशा यांच्या खिशातील रोख ९ हजार रूपये काढून घेवून पसार झाले. या प्रकरणी ट्रकचालक सय्यद पाशा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस मुख्यालयातील सपोनि जाधव, सपोनि सुदर्शन कासार, पोलीस उपनिरिक्षक संदिप ओव्हाळ, पोकॉ दिनेश जमादार यांच्यासह १५ जणांचे पथक कार्यरत होते. ४ सप्टेंबर रोजी या पथकाने राष्ट्रीय महामार्गावर यसवंडी शिवारात ६ जणांच्या टोळीला पकडले. त्यांच्या ताब्यातून २ आयशर टेम्पो, १ ट्रक, २ दुचाकीसह रोख रक्कम जप्त करण्यात आली.

आरोपीमध्ये अलीखान हुसेन अफजल हुसेन (वय ३२), जानअली जहरअली (वय २५) दोघे रा. अकोला, मिर्झा जावेदअली यावर अली (वय ४१) अन्वरअली किस्मतअली (वय ३०) रा. गेवराई जि. बीड, युसूफ शराफतअली (वय ४१) रा. अंबड जि. जालना, गुलाब जाफर हुसेन (वय ४८) रा. मोहोळ जि. सोलापूर या सहा जणांचा समावेश आहे. आरोपींकडून अन्य केलेल्या गुन्ह्यांची माहिती घेतली जात आहे. दुर्स­या जिल्ह्यात अशा प्रकारची टोळी कार्यरत आहे का, याचा तपास केला जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या