उस्मानाबाद : सोलापूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर माळुंब्रा गावाजवळील धाब्यावर डिझेलची चोरी करणारी टोळी पोलिसांना पाहताच जागेवरच कार सोडून पसार झाली. ही घटना ५ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी सुमो कार, डिझेल चोरीसाठी लागणारे साहित्य जप्त करून तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तामलवाडी पोलिस ठाण्याचे पथक हे दि. ५ ऑगस्ट रोजी पहाटे माळुंब्रा ता. तुळजापूर शिवारातील राष्ट्रीय महामार्गावर गस्त करत होते. यावेळी एका धाब्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकजवळ तीन व्यक्ती उभे असल्याचे दिसल्याने पोलिसांनी आपला मोर्चा तीकडे वळवला. पोलिसांना पाहुन ते तीघे अंधारात पसार झाले. यावेळी त्या ट्रकच्या बाजूस एक सुमो कार क्र. एम.एच. २४ सी ८७३१ ही बेवारस आढळून आली. त्या ट्रकच्या इंधन टाकीचे कुलूप तोडून त्यातील डिझेल नळीद्वारे उपसून प्लास्टीक कॅनमध्ये भरुन चोरी केली जात असल्याचे पोलिसांना समजले. यावेळी पोलिसांनी त्या ट्रक चालकास झोपेतून उठवून घडल्या प्रकाराची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळावरील डिझेलसह कॅन, नळी व सुमो कार जप्त केले आहे. त्या कारची मालकी शोधून पोलिस तपासाची पुढील दिशा ठरवत आहेत. या प्रकरणी ट्रक चालक उदय गंगाराम, रा. उत्तरप्रदेश यांच्या फिर्यादीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.