22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeउस्मानाबादतेरणा कारखान्यासाठी पुन्हा फेरनिविदा निघणार

तेरणा कारखान्यासाठी पुन्हा फेरनिविदा निघणार

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : मराठवाडा विभागातील पहिला असलेला व सध्या कर्जबाजारी असल्याने अवसायनात असलेला ढोकी (ता. उस्मानाबाद) येथील तेरणा सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक पुन्हा फेरनिविदा मागविणार आहे, आ.तानाजीराव सावंत यांच्या कारखान्याने दाखल केलेली निविदा कमी दराची असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दिली आहे.

तेरणा कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठी आता पाचव्यांचा फेरनिविदा काढली जाणार आहे. चौथ्यांदा फेरनिविदा काढल्यानंतर १४ ऑक्टोबर निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत होती. मुदतीअखेर शिवसेनेचे माजीमंत्री आ.तानाजीराव सावंत यांची एकमेव निविदा दाखल झाली होती. तेरणा कारखाना आ.सावंत यांच्या ताब्यात २५ वर्षासाठी जाण्याची चिन्हे दिसू लागली होती. एकच निविदा आल्याने बँकेचे संचालक बुचकळ्यात पडले होते. नेमके काय करायचे असा प्रश्न पडला होता. सहकारातील तज्ज्ञ, कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार होता.

आ.सावंत यांच्या भैरवनाथ कारखान्याने दाखल केलेली निविदा किमान दरापेक्षा कमी दराची असल्याने जिल्हा बँकेच्या गुरुवारी दि.१४ रोजी उशीरा झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत फेरनिविदा काढण्याचा निर्णय झाला असून येत्या चार दिवसात पुन्हा निविदेची जाहिरात निघणार आहे. त्यामुळे तेरणा कारखाना नेमका कोणाच्या ताब्यात जातो, हे येणाèया काळात समजणार आहे.

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या परिवारातील ट्वेंटीवन शुगर हा कारखाना तेरणा कारखाना भाडेतत्वावर घेण्यासाठी इच्छुक आहे. परंतू, त्यांना तेरणा कारखान्याकडे अन्य कोणत्या संस्था, कार्यालये यांची बाकी नसल्याचे प्रमाणपत्र (बेबाकी प्रमाणपत्र) हवे आहे. अशा स्वरुपाच्या बेबाक्या देणे जिल्हा बँकेला शक्य नसल्याचे संचालक मंडळाकडून सांगितले जात आहे.

तेरणा कारखाना भाडेतत्वावर घेण्यासाठी कारखानदारांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे जिल्हा बँकेने यापुर्वी चारवेळा फेरनिविदा काढल्या होत्या. दरम्यान, बँकेने दरवर्षी ठरविण्यात आलेले भाडेही कमी केले होते. गाळपाला आलेल्या ऊसाला प्रतिटन टॅगिंगचाही दर कमी केला होता. परंतू तेरणा भाड्याने घेण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. राज्यातील अनेक कारखाने, कंपन्यांनी तेरणा कारखान्याची पाहणी केली होती. त्यामध्ये एस.बी.पाटील शुगर दौंड, लक्ष्मी ऑरगॅनिक पुणे, राजाराम बापू सहकारी साखर कारखाना इस्लामपूर (जि. सांगली), विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना चिचचोलीराव वाडी (लातूर), विलास सहकारी साखर कारखाना निवळी (लातूर), आदी कारखा़न्यांच्या अधिका-यांनी तेरणाची पाहणी केली होती.

प्रत्यक्षात मात्र मेयर कमोडीज प्रा. लि. मुंबई, ट्वेटीवन शुगर प्रा.लि. मुंबई, डीडीएन एसएफए प्रा.लि. मुंबई, धाराशिव साखर कारखाना, आ. तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ शुगर कारखान्यांनी निविदा खरेदी केल्या होत्या. १४ ऑक्टोबर निविदा दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आ. सावंत यांच्या भैरवनाथ कारखान्याने आवश्यक असलेली साडेपाच कोटीची डिपॉझीट रक्कम भरून निविदा दाखल केली आहे. १४ ऑक्टोबरला सायंकाळी निविदा उघडल्यानंतर डीसीसीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये भैरवनाथची निविदा किमान दरापेक्षा कमी दराची असल्याने पुन्हा निविदा मागविण्याचा निर्णय झाला.

ढोकी येथील तेरणा साखर कारखाना २००७ मध्ये सत्तांतर होऊन विद्यमान खासदार ओमराजे qनबाळकर यांच्या ताब्यात आला होता. त्यापुर्वी हा कारखाना माजीमंत्री डॉ. पद्मqसह पाटील यांच्या ताब्यात होता. २०१२ पासून कारखाना बंद अवस्थेत आहे. कारखान्याच्या मालकीची कोट्यावधी रुपये बाजारभाव असलेली १४३ एकर जमिन आहे. यापैकी १०५ एकरावर कारखाना व इमारती उभारण्यात आलेल्या आहेत. कारखान्याचे एक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित विद्यालय आहे. कारखान्याकडे जिल्हा बँकेचे जवळपास ३१२ कोटी रुपयांचे कर्ज आहे. कामगारांची कोट्यावधी रुपयांची देणी थकीत आहेत. याशिवाय केंद्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे देणे थकीत आहे.

ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी, वाहतूक ठेकेदार यांचीही देणी थकीत आहेत. एकंदर पाहता तेरणा कारखान्यावर कोट्यावधी रुपयांचे कर्ज असल्याने शासनाने हा कारखाना अवसायनात काढून कारखान्यावर अवसायकाची नेमणूक केलेली आहे. केंद्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने तेरणा कारखाना सील केला होता. त्यामुळे हे प्रकरण जिल्हा बँकेने न्यायालयात दाखल केले होते. परिणामी तेरणा भाडेतत्वावर देण्यासाठी विलंब लागत होता. न्यायालयात हे प्रकरण तडजोडीने मिटल्याने तेरणा भाडेतत्वावर देण्याचा मार्ग मोकळा झाला.

तेरणा कोणालाही द्या पण सुरू करा
जवळपास ३६ हजार शेतकरी सभासद, कामगारांची लक्ष्मी असलेला तेरणा कारखाना गेल्या ९ वर्षापासून बंद आहे. तेरणा सुरू व्हावा, यासाठी तेरणा बचाव संघर्ष समिती गेल्या अनेक महिन्यापासून प्रयत्न करीत आहे. गेल्यावर्षी कारखाना परिसरात व जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यंदाही चांगला पाऊस झाल्याने ऊस लागवड वाढणार आहे. परिणामी ऊस गाळपाचा प्रश्न भेडसावणार आहे. कसलेही राजकारण न करता तेरणा कोणालाही भाडेतत्वावर द्या पण कारखाना यंदा सुरू करा, अशी मागणी शेतक-यांतून होत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या