उस्मानाबाद : जिल्हाभरातील पोलीस ठाण्यातील पथकांच्या माध्यमातून अवैधरित्या दारू विक्री करर्णाया अड्ड्यांवर छापे मारले जात आहेत. असे असतानाही अवैधरित्या गावठी दारू बनविण्याचे अड्डे, चोरट्या मार्गाने देशी-विदेशी दारूची होणारी विक्री थांबण्याचे नाव घेत नाही. 27 जुलै रोजीही उमरगा व नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या पथकांनी आपआपल्या हद्दीतील अवैध दारू विक्री अड्ड्यांवर छापे टाकले. यामध्ये लाखो रूपयांचे गावठी दारू बनविण्यासाठीचे रसायन नष्ट करण्यात आले. तसेच देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरून उमरगा पोलीस ठाण्याच्या पथकाने पोलीस ठाणे हद्दीतील अवैध मद्य विरोधी कारवाई साठी 27 जुलै रोजी पहाटेपासून गस्तीस होते. दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने 07.20 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील पळसगाव साठवण तलाव परिसरात गावठी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी तेथे पळसगाव तांडा येथील मनोज सिताराम पवार, मधुकर थावरू राठोड, संजय उमाजी राठोड, निळकंठ पुना राठोड हे गावठी दारू निर्मिती करताना आढळले. घटनास्थळी गावठी दारू निर्मितीचा गुळ-पाणी मिश्रणाचा 2 हजार लिटर आंबवलेला द्रव हा 14 लोखंडी ंिपपांत तसेच 10 प्लास्टिकच्या घागरीत 140 लिटर गावठी दारू असा एकूण अंदाजे 1 लाख 13 हजार 100 रूपयेकिंमतीचा मुद्देमाल आढळला.
गावठी दारू निर्मितीचा द्रव पदार्थ हा नाशवंत असल्याने पथकाने तो जागीच ओतून नष्ट केला तर गावठी दारू जप्त करून नमूद व्यक्तींविरूध्द उमरगा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 64 (फ) (ई), 81, 83 अंतर्गत नोंदवला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा पोलीस ठाण्याचे पोनि मनोज राठोड, पोहेकॉ वाल्मीक कोळी, दिगंबर सूर्यवंशी, सुनिता राठोड, घोळसगाव, पोना विजयकुमार कांबळे, सिध्देश्वर उंबरे, बबिता चव्हाण, वाघुलकर, पाटोळे, पोकॉ तानाजी शिंदे, सय्यद यांच्या पथकाने केली.
नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पथक 26 जुलै रोजी गस्तीस होते. दरम्यान, गोपनीय माहितीच्या आधारे सिंदगाव व चिवरी येथे छापे टाकले. यावेळी सिंदगाव येथील काशिनाथ भिमशा धोत्रे हे आपल्या पत्रा शेडमध्ये 193 बाटल्या विदेशी दारू व 15 बाटल्या देशी दारू असा अंदाजे 40 हजार 630 रूपयेकिंमतीचा दारू साठा बाळगलेले आढळले. तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील दादाराव गणपती शिंदे हे महालक्ष्मी मंदिराच्या बाजूस 70 बाटल्या देशी- विदेशी दारू असा 7 हजार 855 रूपयेकिंमतीचा दारू साठा बाळगलेले आढळले. पथकाने मद्य साठा जप्त करून काशिनाथ धोत्रे व दादाराव शिंदे यांच्या विरूध्द नळदुर्ग ठाण्यात गुन्हा दाखल केला. सदरची कामगिरी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सपोनि. सिध्देश्वर गोरे, पोहेकॉ जितेंद्र कोळी, संतोष सोनवने, गौतम शिंदे, पोकॉ मनमिथ पवार यांच्या पथकाने केली.