उस्मानाबाद : वीज कंत्राटी कर्मचारी कृती समितीच्या वतीने रिक्त जागेवर कंत्राटी कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि.७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मागण्या मान्य करा, अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्या, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील विविध संघटनेचे जवळपास दोनशे ते अडीचशे कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे महावितरणची अनेक कामे खोळंबली आहेत.
महावितरण कंपनीच्या मंजुर रिक्त जागेवर १० ते १५ वर्षांपासून काम करणा-या वीज कंत्राटी कामगारांची नियुक्ती करावी. भरतीमधील पात्रता निकष बदलून १० वीच्या मार्कनुसार मेरिट ग्राह्य न धरता त्या उद्योगातील आयटीआयचे मार्कनुसार मेरिट लावावे. तसेच अनुभवी कंत्राटी कामगारांना वयाच्या ५८ वर्षांपर्यंत रोजगार द्यावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू केले आहे.
यावेळी मागण्या मान्य करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचा-यांनी विविध घोषणा देवून परिसर दणाणून सोडला. यावेळी आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा ईच्छा मरणाची परवानगी द्या अशी मागणीही यावेळी वीज कर्मचाèयांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या आंदोलनात महाराष्ट्र वीज कंत्राटी संघ संलग्न भारतीय मजदूर संघ, तांत्रिक अप्रेंटीस, कंत्राटी कामगार असोसिएशनचे, महाराष्ट्र बाह्यस्रोत वीज कंत्राटी संघटना आशा विविध संघटनांनी एकत्र येत हे आंदोलन सुरू केले आहे. दोनशे ते अडीचशे कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
त्यामुळे पहिल्याच दिवशी वीज वितरण कंपनीची अनेक कामे खोळंबली आहेत. हे आंदोलन बेमुदत असल्यामुळे शासनाकडून मागण्याबाबत काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे. तोपर्यंत महावितरणमधील सर्वसामान्य नागरिकांची कामे मोठ्या प्रमाणात खोळंबली जाणार आहेत.
धक्कादायक : संशयावरून पतीने पत्नीचा खून; शरीराचे तुकडे तुकडे करून फेकले