उस्मानाबाद : तालुक्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या आवारातील साहित्याची १ ते ३ ऑगस्ट रोजी चोरी झाली होती. यातील आरोपीस पोलिसांनी चोरीच्या साहित्यासह ताब्यात घेतले आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना आवारातील कार्बन बेरींगचे कव्हर, आरबीसी चैनच्या कड्या, लोखंडी नळाच्या मोटारीची कपलिंग व प्लेजेन्स तसेच बैलगाडीच्या चाकाचे दोन डिक्स असे एकूण अंदाजे २० हजार रूपये किंमतीचे साहित्य अज्ञात व्यक्तीने १ ते ३ ऑगस्टच्या दरम्यान चोरून नेले होते. याप्रकरणी कारखान्याचे पहारेकरी सुनिल जनार्धन लंगडे यांनी ढोकी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यावरून ढोकी ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा क्र. २५०/२०२२ हा भा.दं.सं. कलम ३७९ अंतर्गत नोंदविण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास ढोकी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदिश राऊत यांच्या पथकाने सुरू केला होता.
दरम्यान, पथकाने लागलीच तपास गतीमान केला. गुन्ह्याच्या कार्यपध्दतीचा अभ्यास करून मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे ढोकी पारधी पिढी येथील बबलू हिराजी शिंदे (वय १९) व तेर येथील- फरदीन आलिम शेख (वय २२) या दोघांना ४ ऑगस्ट रोजी ढोकी पारधी पिढी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर दोन आरोपींच्या ताब्यातून नमूद चोरीच्या साहित्यासह चोरी करण्यास वापरलेले ओमिनी वाहन जप्त केले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जगदिश राऊत यांच्या पथकाने केली.