उस्मानाबाद : शहरातील पारधी पिढी येथील एकाचा 14 डिसेंबर रोजी जुन्या वादातून खून करण्यात आला होता. यातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
उस्मानाबाद शहरातील पारधी पिढी येथील दादा रामा काळे यांनी जुन्या वादातून 14 डिसेंबर रोजी गावसूद गावाकडे जाणार्या रस्त्यावर शरिफ ईस्माईल सय्यद (वय 32) यांच्या डोक्यात लोखंडी गज, दगड मारून खून केला होता.
याप्रकरणी मयताचा भाऊ शमशोद्दीन सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंसं कलम 302 अंतर्गत उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 377/2022 हा नोंदवला आहे. सदर गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक 17 डिसेंबर रोजी सुतगिरणी, सांजा शिवार येथे असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की, नमूद गुन्ह्यातील आरोपी हा कनगरा फाटा येथे थांबलेला असून, त्याच्या अंगावर पांढर्या रंगाचा सदरा आहे. यावर पथकाने लागलीच नमूद ठिकाणी धाव घेऊन बातमीतील वर्णनाशी मिळताजुळता व्यक्ती आढळल्याने पथकाने त्याची विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव दादा रामा काळे (रा. पारधी पिढी, उस्मानाबाद) असे सांगितले. यावर पथकाने त्यास अटक करून पुढील कार्यवाहिस्तव उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोनि यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, अशोक ढगारे, रविंद्र आरसेवाड यांच्या पथकाने केली.