26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeउस्मानाबादउस्मानाबादेत तोतया पोलिसांकडून वृद्धाला गंडा

उस्मानाबादेत तोतया पोलिसांकडून वृद्धाला गंडा

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : पोलिस असल्याची थाप मारून एका ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची सोन्याची चैन व अंगठी हातचलाखी करून लंपास केली. ही घटना ३० जुलै रोजी उस्मानाबाद शहरातील संभाजीनगर भागात घडली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोघांच्या विरोधात आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसापासुन तोतया पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांना फसविण्याच्या घटना वाढल्या आहेत. चांगले सुशिक्षीत असलेले व सेवानिवृत्त झालेले नागरिक बळी पडत आहेत. पोलीस असल्याचे सांगताच अनेकांनी जवळ असलेल्या सोन्याच्या वस्तू काढून दिल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद शहरातील शंकरनगर भागात राहणारे ज्येष्ठ नागरिक अनंत खुळे (वय ७५) हे ३० जुलै रोजी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद येथील हिरो शोरुमच्या मागील रस्त्याने आपल्या घराकउे पायी चालत जात होते. दरम्यान समोरुन आलेल्या एका मोटारसायकलवरील तोंडास मास्क लावलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी अनंत खुळे यांना थांबविले.

आम्ही पोलीस असून रात्रीच एक चोरीचे प्रकरण झाले आहे. अशात तुम्ही अंगावर सोने का घालता, ते काढून हात रुमालात बांधून ठेवा. अशी खुळे यांना बतावणी केली. यानंतर खुळे हे आपल्या अंगावरील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी व ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असे एकुण अंदाजे ६० हजार रुपये किंमतीचे दागिने आपल्या हातरुमालात बांधत असताना त्या दोन भामट्यांनी आपल्या हाताने बांधून देण्याचा बहाणा करुन रुमालातील ते दागिने हातचलाखीने काढून घेतले.

यानंतर खुळे हे तेथून आपल्या घरी परतले असता त्यांनी रुमाल सोडून पाहिल्यावर त्यांना आपले दागिने दिसून आले नाहीत. या प्रकरणी अनंत खुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा आनंदनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या