उस्मानाबाद : अंगणवाडी सेविका व मदतनिसाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शासनाच्या एकात्मिक बालविकास विभागाचे आयुक्त, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी राज्य सरकारकडे शिफारस करावी, या मागणीसाठी सोमवारी (दि.१३) उस्मानाबादेत धरणे आंदोलन करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या प्रांगणात राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. राज्यातील अंगणवाडी कर्मचार्यांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा, वेतनश्रेणी व अन्य लाभ देण्यात यावेत, सेवासमाप्तीनंतर मासिक पेन्शन लागू करावी, दैनंदिन कामकाजाकरिता नवीन मोबाइल फोन घेण्यासाठी १० हजार रूपये देण्यात यावेत, केंद्र शासनाचे पोषण ट्रॅकर अॅप संपूर्णपणे मराठी भाषेत करून त्यातील त्रुटी दूर करण्यात याव्यात, मोबाइलवर काम करण्यासाठी सेविका व मदतनिसांना देण्यात येणार्या पाचशे रूपये व २५० रूपये प्रोत्साहनपर भत्यात वाढ करावी, अंगणवाडी सेविकांच्या रिक्त जागा तत्काळ भराव्यात, सर्व मिनी अंगणवाड्यांचे मोठ्या अंगणवाड्यांमध्ये रूपांतर करावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख, राज्य संघटक दत्ता देशमुख, जिल्हाध्यक्षा प्रभावती गायकवाड, बापू शिंदे यांची स्वाक्षरी आहे.