उस्मानाबाद : सीताफळ लागवडीसाठी मिळणारे अनुदान देण्यासाठी शेतक-यांकडून लाचेची मागणी करणारा उस्मानाबाद तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ््यात अडकला आहे. या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
आरोपी लोकसेवक श्रीकांत रामकृष्ण मगर (४६) हे कृषी सहाय्यक म्हणून तालुका कृषी अधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे कार्यरत आहेत. त्यांनी सारोळा ता. उस्मानाबाद येथील एका शेतक-याकडून सीताफळ लागवडीसाठी मिळणा-या अनुदानासाठी प्रत्येक मस्टरसाठी ५०० रुपये या प्रमाणे २४ मार्च २०२२ रोजी लाचेची मागणी केली होती. लाचेच्या मागणीची पडताळणी केल्यानंतर कृषी सहाय्यक श्रीकांत मगर यांनी लाच मागितल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणी गुरुवार, दि. २ जून रोजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
ही कारवाई सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांनी पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. सापळा पथकामध्ये पोलीस अंमलदार दिनकर उगलमूगले, इफ्तेकार शेख, विष्णू बेळे, नागेश शेरकर यांचा समावेश होता.