25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeउस्मानाबादलॉकडाऊन काळातील कामगारांच्या रकमेवरही दलालांचा दरोडा

लॉकडाऊन काळातील कामगारांच्या रकमेवरही दलालांचा दरोडा

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम मजुरांची उपासमार होऊ नये म्हणून लॉकडाऊन काळात उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास ३० हजार नोंदणीकृत मजुरांच्या खात्यावर दोन टप्यात (२ हजार व ३ हजार) ५ हजार रुपयांची रक्कम थेट ऑनलाईन जमा करण्यात आली आहे. ही रक्कम १५ कोटीच्या घरात आहे. या रकमेतील अर्धी रक्कम बांधकाम मजुरांकडून घेण्यात आली असून दलाल व सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांनी वाटून घेतल्याचा प्रकार उजेडात आला आहे. दैनिक एकमतमध्ये बांधकाम मजुरांच्या रकमेवर कसा डल्ला मारला जात आहे, याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर गावोगावचे बांधकाम मजूर आमचीही कशी लूट झाली हे सांगू लागले आहेत.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम मजुरांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. बांधकाम मजुरांना या योजनांच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक सवलती देण्यात येतात. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात सरकारी कामगार अधिकारी कार्यालय व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कार्यालयाच्या वतीने बोगस बांधकाम मजुरांची नोंदणी करून करोडो रुपयांच्या निधीवर पारदर्शक दरोडा टाकण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आजअखेर ६० हजाराच्या जवळपास नोंदणीकृत बांधकाम मजुरांची संख्या आहे. यापैकी गावोगावचे ८० टक्के बांधकाम मजूर बोगस असून ते बांधकाम व्यवसायाशी संबंधित नाहीत. ही बाब एकमतने अनेक गावात केलेल्या चौकशीतून स्पष्ट झाली आहे. बोगस लाभार्थीच्या नावावर जमा झालेली अर्धी (५० टक्के) रक्कम दलालामार्फत माघारी घेऊन मोठा भ्रष्टाचार करण्यात आला आहे.

कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. लोकांना कामासाठी घराबाहेर पडता येत नव्हते. त्यामुळे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने मजुरांची उपासमार होऊ नये म्हणून नोंदणीकृत मजुरांच्या बँक खात्यावर ऑनलाईन एकदा २ हजार रुपये व परत ३ हजार रुपये अशी एकूण ५ हजार रुपयाची रक्कम जमा करण्यात आली. उस्मानाबाद जिल्ह्यात ३० हजार २८३ कामगारांच्या खात्यावर दोन टप्यात ५ हजार रुपये जमा करण्यात आल्याची माहिती सरकारी कामगार कार्यालयातून देण्यात आली. ही रक्कम १५ कोटी १४ लाख १५ हजार रुपये आहे. गावोगावच्या दलालांनी ५ हजारापैकी २ हजार ५०० रुपये बांधकाम मजुराकडून घेऊन दलाल व कामगार अधिका-यांनी लूट केली आहे.

२०१३ मध्ये राज्यात न्यायालयाच्या आदेशावरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली असून हे मंडळ प्रत्येक जिल्ह्यात सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाला जोडण्यात आले आहे, या मंडळाच्या माध्यमातून बांधकाम मजुरांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. बांधकाम मजुर म्हणून नोंदणी झाल्यानंतर लगेचच त्या मजुराच्या बँक खात्यावर ५ हजार रुपये आवश्यक बांधकाम हत्यारे, अवजारे खरेदी करण्यासाठी जमा केले जातात. यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात बांधकाम मजुरांची नोंदणी करण्यासाठी गावोगावी दलाल तयार झाले आहेत.

नोंदणी करण्यासाठी सुरुवातीला त्या मजुराकडून ५०० रुपये घेतले जातात. नोंदणी झाल्यानंतर मजुराच्या खात्यावर जमा झालेल्या ५ हजारापैकी २ हजार ५०० रुपये त्या दलालाला द्यावे लागतात. पैसे देण्यास नकार दिल्यास पुढील मिळणारे लाभ बंद करण्याची धमकी दिली जाते. तो दलाल २ हजार रुपये सरकारी कामगार अधिकार्याला पोहच करतो. अशी ही साखळी असून या कार्यालयाचे गावोगावी दलाल कार्यरत आहेत. बांधकाम मजुरांची मुले शाळेत, महाविद्यालयात असल्यास त्या विद्याथ्र्यांना २५०० रुपयापासून दोन लाखापर्यंत शैक्षणिक प्रतिपुर्ती रक्कम या मंडळाच्या वतीने दिली जाते. एवढी मोठी रक्कम मजुरांना सहज मिळत असल्याने या रकमेपैकी अध्र्या रक्कमेवर दलाल व बांधकाम अधिकारी डल्ला मारतात. हा भ्रष्टाचार गावोगावी उघडपणे सुरू आहे.

सध्या जिल्ह्यात बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत मजुरांना मोफत सुरक्षा साधनांच्या संचचा (किट) पुरवठा केला जात आहे. गावोगावी याचे वाटप सुरू असून किटसाठी एका मजुराकडून एक हजार ते दिड हजार रुपये घेतले जात आहेत. याचे व्हिडीओ चित्रीकरण एकमतच्या टीमने केले असून अनेक बांधकाम मजुरांनी यामध्ये दलाल व कामगार अधिकारी यांच्यावर आरोप केले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात आजअखेर जवळपास ६० हजार नोंदणीकृत बांधकाम मजूर असून त्यांना प्रत्येकी ५००० रुपये अवजारे खरेदीसाठी देण्यात आले आहेत. लॉकडाऊन काळात प्रत्येकी मजुराला ५ हजार दिले आहेत. सध्या मोफत किटचे वाटप असताना एक हजार ते दिड हजार रुपये घेतले जात आहेत. बांधकाम मजुरांना अर्धी रक्कम परत करावी लागत असल्याने याच्या माध्यमातून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या घरावर धाडी मारून त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

किटसाठी १६०० रुपये दिले : विशाल कदम
या बाबत पानवाडी ता. उस्मानाबाद येथील विशाल महात्मा कदम म्हणाले की, पानवाडी येथेही नोंदणीकृत बांधकाम मजुरांची संख्या मोठी आहे. माझे आई व वडील नोंदणीकृत बांधकाम मजूर असून दिवाळीमध्ये दलालामार्फत दोन सुरक्षा साधनांचा समावेश असलेल्या दोन किट मिळाल्या असून दलालाने ८०० रुपये प्रमाणे दोन किटसाठी १६०० रुपये घेतले आहेत. लॉकडाऊन काळातही पाच हजार रुपये प्रत्येकाच्या नावावर जमा झाले होते. त्यापैकी अर्धी रक्कम दलालाला दिली आहे. रक्कम देण्यास नकार दिल्याल लाभ आडविण्याची धमकी दिली जाते.

बांधकाम मजुरांनी संपर्क साधावा
जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालय व इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी तसेच दलालाकडून बांधकाम मजुरांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट झालेली आहे. या कार्यालयाच्या योजना मजुरांना शंभर टक्के अनुदानावर असून कोणत्याही योजनेसाठी एक रुपयाही लागत नाही. मात्र बांधकाम मजुराकडून निम्मी रक्कम उकळण्यात आली आहे. ज्या मजूराकडून अशी लुट झाली आहे. त्या मजुरांनी दैनिक एकमत कार्यालयाशी व ९४०४३८०८११ या क्रमांकावर संपर्क साधावा.

राष्‍ट्रवादी- भाजपाचे सरकार स्थापन होणार होते. पण शरद पवारांनी ऐनवेळी निर्णय बदलला !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या