22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeउस्मानाबादशासनाच्या योजनेत अपहार करणार्‍या ७ अधिकार्‍यांसह ३ दलालावर गुन्हे दाखल

शासनाच्या योजनेत अपहार करणार्‍या ७ अधिकार्‍यांसह ३ दलालावर गुन्हे दाखल

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : शासनाची योजना हडप करण्याच्या उद्देशाने बनावट व खोटी कागदपत्रे तयार करुन बोगस कामगारांची नोंद करुन अनुदान लाटल्याप्रकरणी ७ तत्कालीन सरकारी कामगार अधिकारी व ३ दलालावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासह फसवणूक व विविध कलमाद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रशांत संपते यांनी चौकशी करुन दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लाचलुचपत विभागाने अश्या स्वरूपाचा तपास करुन गुन्हा नोंद करण्याची ही उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे. या कारवाईने अधिकारी व दलालांची टोळी हादरून गेली आहे तर या घोटाळ्यातील सर्व १० आरोपी फरार आहेत.

जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातील तत्कालीन सरकारी कामगार अधिकारी जे. व्ही. मिटके, एस. आर. सोलंकर, अजिंक्य पवार, एम. आर. काकडे, ए. ए. देशपांडे, एस. जी. वैद्य, जी. एस. राऊत या ७ अधिकारी व घोटाळ्यात सहभागी असलेले प्रमोद रामचंद्र कुलकर्णी (उंबरे कोठा, उस्मानाबाद), सय्यद अतीखउल्ला हुसेनी असदउल्ला हुसेनी (खाजानगर, उस्मानाबाद) व पाशुमिया बाबुलाल शेख (महाळंगी, ता. उस्मानाबाद) या ३ दलाला विरोधात गुन्हा नोंद करणार्‍यात आला आहे. याचा पुढील तपास लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक विलास राठोड हे करीत आहेत.

शासनाच्या मालमत्तेची अफरातफर करण्यासाठी या १० जणांनी संगणमत करुन खोटे व बनावट कागदपत्रे तयार केली व त्याचा लाभ घेण्यासाठी वापर केला व प्राथमिक तपासात 2 लाख १० हजार रुपयांची फसवणूक केली तसेच घोटाळा केल्यानंतर तो उघड होऊ नये, यासाठी पुराव्याच्या दृष्टीने उपयुक्त असलेली काही कागदपत्रे नष्ट केली असे तपासात उघड झाले. १ जानेवारी २०१५ ते ३१ डिसेंबर २०१७ या काळात हा घोटाळा केला असून तो बाहेर काढण्यात लाचलुचपत विभागाला यश आले आहे.

हे एक उदाहरण असून या अनुषंगाने लाचलुचपत विभाग या कार्यालयातील इतर योजनांचा तपास म्हणजे एक प्रकारे ऑडिट करणार आहे. नागरिकांना या कार्यालयात सुरु असलेल्या घोटाळ्याबाबत माहिती असल्यास पुराव्यासह संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक संपते यांनी केले आहे.

भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम १३(१)क, १३(१) ड, १३(२) व भादंवीचे कलम ४०९,४२०,४६७,४६८,४७१,२०१ व ३४ प्रमाणे आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लाचलुचपत विभाग याची चौकशी करीत असल्याने त्याचा तपास त्यांच्या यंत्रणाकडून केला जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक तानाजी दराडे यांनी दिली.

असा घातला घोटाळा
कामगार विभाग मार्फत कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यात कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षकांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेचा लाभ देण्यासाठी जे कामगार नाहीत, त्यांना कागदोपत्री कामगार दाखविण्यात आले. शिवाय काहींना एकाच वर्षात 2 वेळेस लाभ देण्यात आला. तर सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी यांना कामगार दाखवून योजनेचे पैसे लाटण्यात आले.

असा उघड झाला प्रकार
लाचलुचपत विभागाकडे एक तक्रार आल्यानंतर त्यांनी गोपनीय चौकशी करुन काही कागदपत्रे गोळा केली. त्यावेळी अधिकार्‍यांनी घोटाळा करण्यासाठी काही दलाल लोकांची मदत घेतल्याचे समोर आले. तसेच काही कागदपत्रे घोटाळा उघड होऊ नये, यासाठी नष्ट केल्याचे समोर आले. लाचलुचपत विभागाने खुली चौकशी केल्याचे हे प्रकरण असून इतर भ्रष्टाचार या प्रकारात मोडते.

एरव्ही हा विभाग ट्रॅप झाल्यावर किंवा मागणी केल्याचे सिद्ध झाल्यावर गुन्हा नोंद करतो तर दुसर्‍या प्रकारात बेहिशोबी मालमत्ता प्रकारात अपसंपदा असल्याचे उघड झाल्यावर गुन्हा नोंद करते तर तिसर्‍या प्रकारात एखादी तक्रार आल्यावर त्याची खुली व गोपनीय चौकशी करुन गुन्हा नोंद करते, हा प्रकार इतर भ्रष्टाचारमध्ये मोडतो.

कामगार अधिकारी विभाग भ्रष्टाचाराचा अड्डा
कामगार विभाग हा गेल्या काही वर्षात भ्रष्टाचाराचा अड्डा बनला असून विविध योजना राबविण्यासाठी येथे सर्रास लाच घेतली जाते तर येथे काही संघटनाचे पुढारी कम दलालांचा सुळसुळाट आहे. कामगारांसाठी असलेली योजना हे काही अधिकारी व दलाल बोगस नोंदणी करुन लाटत आहेत. कामगारांसाठी असलेल्या मध्यान्ह भोजन योजनासह सुरक्षा उपकरणे पुरवठा योजनेचे असेच प्रकार असल्याने चौकशीची गरज आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या