उस्मानाबाद : मुख्याध्यापकाच्या खात्यावर जमा झालेल्या वेतनाचे व अनुदानाचे ऑडीटरकडून लेखापरिक्षण करून देण्यासाठी मुख्याध्यापिकेकडून 300 रूपयांची लाच घेताना केंद्रीय शाळेच्या मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.8) रोजी तेरखेडा ता. वाशी येथे करण्यात आली. या प्रकरणी मुख्ंयाध्यापकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच घेताना कारवाई झालेला मुख्याध्यापक सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ह्या तेरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापिका असून मुख्याध्यापकाच्या खात्यावर जमा झालेल्या वेतनाचे व अनुदानाचे ऑडीटर कडून लेखापरिक्षण करून देण्यासाठी तेरखेडा ता. वाशी येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचा मुख्याध्यापक भारत रामभाऊ भालेकर (वय 58) याने तक्रारदार महिलेकडे 300 रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार महिलेची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून एसीबीच्या पथकाने सापळा रचला होता. बुधवारी (दि.8) रोजी महिला तक्रारदार महिलेकडून 300 रूपयांची लाच घेताना केंद्रीय मुख्याध्यापक भारत भालेकर याला पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सापळा अधिकारी पोलीस निरिक्षक विकास राठोड यांच्या पथकाने केली. पथकामध्ये पोलीस अंमलदार इफ्तेकार शेख, मधुकर जाधव, सचिन शेवाळे यांचा समावेश होता.