उस्मानाबाद : जिल्ह्याच्या अनेक भागात बुधवारी दि. ३ व गुरुवारी दि. ४ ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस झाला. काही भागात ढगफुटी सारखा पाऊस झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. काही भागात पुलावरून पाणी जात असल्याने संपर्क तुटला आहे. तुळजापूर तालुक्यातील बोरी धरण व उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील तेरणा धरण शंभर टक्के भरले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या ३६० मिमी पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात दररोज कुठेना कुठे दमदार पाऊस होत आहे. बुधवारी दुपारी उस्मानाबाद तालुक्यातील बावी परिसरात ढगफुटी सारखा पाऊस झाला. पाऊस उघडल्यानंतर लगेचच नदी, नाल्यांना पूर आला. अनेकांची शेती व पिके पाण्याखाली गेली आहेत. उस्मानाबाद शहर, उस्मानाबाद ग्रामीण व जागजी मंडळामध्येही दमदार पाऊस झाला आहे. तेरणा नदीच्या पट्यात चांगले पाऊस झाल्याने तेर येथील तेरणा धरण शंभर टक्के भरले आहे. तुळजापूर तालुक्यातील तुळजापूरसह सालेगाव, सावरगाव, मंगरूळ मंडळामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. मंगरूळ मंडळामध्ये ६९ मिमी पाऊस होवून अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नळदुर्ग येथील बोरी धरण शंभर टक्के भरले आहे.
गुरुवारी दुपारी उस्मानाबाद तालुक्यातील कारी शिवारात ढगफुटीसारखा पाऊस झाला. हा पाऊस तब्बल तीन तास सुरू होता. अचानक पडलेल्या पावसामुळे शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत. अनेक शेतकर्यांनी केलेली बांधबंदीस्ती पावसाच्या पाण्याने फुटली आहे. नदी, ओढ्यांना पूर आला आहे. गुरुवारी दुपारी कसबे तडवळे, ढोकी, तेर या भागात दिड तास मुसळधार पाऊस झाला आहे. तेर-डकवाडी रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत होते. सध्या खरिप पिकांना वाफशाची गरज आहे. परंतु दररोजच पाऊस होत असल्याने पिके संकटात सापडली आहेत. पेरणी झाल्यापासून सोयाबीन पिकांवर संकटे येत आहेत. सुरूवातीला गोगलगाव, पैसा या किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने जिल्ह्यातील सोयाबीन पिक संकटात सापडले होते. आता दररोज पाऊस होत असल्याने त्याचा पिकांवर प्रतिकूल परिणाम होताना दिसत आहे.
चार दिवसाखाली येडशी, एरंडगाव भागात अचानक ढगफुटीसारखा पाऊस झाला होता. अनेकांची पिके पाण्याखाली गेली होती. जागजी, कोंड, सुंभा, नितळी भागातही ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने पिके वाया गेली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होवूनही पर्जन्यमापक यंत्रावर अतिवृष्टीची नोंद झालेली नाही. त्यामुळे पर्जन्यमापकाच्या नोंदीवर शंका उपस्थित होवू लागली आहे. झालेल्या नुकसानींची दखल घेवून भाजप नेते आ. राणाजगजितसिंह पाटील, शिवसेनेचे आमदार कैलास पाटील, माजीमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दौरे करून नुकसानीची पाहणी केली आहे. कृषी व महसूल विभागाच्या अधिकार्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
अनेक भागात ढगफुटीसारखा पाऊस
गेल्या दोन-तीन वर्षापासून उस्मानाबाद जिल्ह्यात ढगफुटीसारखा पाऊस होत आहे. हा पाऊस सर्वदूर नसतो. काही भागात अचानक पावसाला सुरूवात होते. अर्धा-एक तास पाऊस होतो. या पावसाने नदि,नाल्यांना पूर येतो. यावर्षीही अनेक भागात ढगफुटीसारखा अचानक पाऊस झालेला आहे. येडशी, जागजी, कोंड, सुंभा, नितळी, बावी या भागात यंदा ढगफुटीसारखा अचानक पाऊस होवून पिकांचे नुकसान झाले आहे. जमिनी खरडून गेल्या आहेत. नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्यांतून होत आहे.