उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयामार्फत २५ मे रोजी लातूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या अहवालामधील प्रलंबित असलेल्या पाच अहवालामधून तीन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर दोन व्यक्तींचे अहवाल अनिर्णित आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे. जिल्ह्यात आजअखेर कोरोना रुग्णांची संख्या ३८ झाली असून उपचारानंतर ९ जणांना घरी पाठविण्यात आले आहे. २९ रुग्णावर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चाचली असून ग्रीन झोनमध्ये असलेला उस्मानाबाद जिल्हा आता रेड झोनमध्ये गेला आहे.
जिल्ह्यात मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्या तीन व्यक्तीपैकी एक उस्मानाबाद शहरातील पापनाश नगर येथील रुग्ण असून तो मुंबई येथून प्रवास करून आलेला आहे.दुसरा तेर येथील रुग्ण असून तो पुणे येथून आलेला आहे. तर तिसरा पॉझिटिव्ह रुग्ण हा कळंब तालुक्यातील शिराढोण येथील पुर्वीच्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेला आहे, असे वैद्यकिय अधिकारी डॉ. सतीश आदटराव व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी सांगितले.
Read More डोकलामनंतर पहिल्यांदाच भारत-चीनमध्ये मोठ्या संघर्षाची शक्यता
उस्मानाबाद जिल्ह्यात पुणे, मुंबई आदी रेड झोनमधून येणा-या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यांना गावात आल्यानंतर होम क्वारंटाईन केले जाते. ज्या व्यक्तींना शेती आहे, अशांना त्यांच्या शेतात क्वारंटाईन केले जाते. ज्यांना शेती नाही, त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत क्वारंटाईन केले जाते. लहान बालके व महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घरात क्वारंटाईन केले जात आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असून बहुतांश रुग्ण हे पुणे, मुंबई येथून आलेले सापडत आहेत. रुग्ण सापडल्यानंतर तो रुग्ण राहत असलेले गाव सील करण्यात येत आहे. शहरी भागातील रुग्ण असल्यास तेथील काही भाग सील केला जात आहे.
मंगळवारी तेर येथे एक रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाने तो भाग सील केला आहे. त्या भागात जाण्यास व येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेतली जात असून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत. उस्मानाबाद शहरातील पापनाश नगर भागात रुग्ण आढळल्याने प्रशासनाने हा भाग सील केला असून त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या जवळच्या व्यक्तींची माहिती घेतली जात आहे. कळंब तालुक्यातील शिराढोण येथे एक रुग्ण सापडला असून हा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेला आहे. शिराढोण गाव यापूर्वीच सील करण्यात आलेले आहे.
भंडारवाडी ता. उस्मानाबाद येथील एका व्यक्तीचा स्वॅब सोमवारी तपासणीसाठी लातूर प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.जिल्ह्यात एकही रुग्ण संख्या नव्हती तेंव्हा जिल्हा कडकडीत बंद होता. आता दररोज जिल्ह्यात कोठेना कोठे तरी रुग्ण सापडत असताना जिल्ह्यातील सर्व आस्थापना, दुकाने सुरू आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने पुर्वीसारखे कडक निर्बंध लादण्याची गरज निर्माण झाली आहे.