उस्मानाबाद : जिल्ह्यात शनिवार व रविवार हे कोरोना रुग्णाच्या मृत्यूचे वार ठरले असून २ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील ७० वर्षीय कोरोनामुक्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर कळंब तालुक्यातील पाथर्डी येथील एका संशयीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात पाच जणांचा बळी गेल्याची माहिती डॉ सतीश आदटराव यांनी दिली.
गेल्या २४ तासात कोरोनामुळे २ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. उस्मानाबाद शहरातील काकानगर येथील उस्मानपुरा भागातील ५० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता. हा रुग्ण नळदुर्ग येथील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आला होता. त्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली होती. नळदुर्ग येथील कोरोना रुग्णामुळे उस्मानाबाद शहरातील उस्मानपुरा या भागात अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा शुक्रवारी (दि.१२) ४ था बळी गेला होता. उस्मानाबाद शहरातील धारासुर मर्दिनी देवी रोड भागातील तरुणाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. या रुग्णाला कॅन्सरचा आजार होता. त्यातच त्याला कोरोनाची लागण झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाच्या थेट संपर्कात सर्व जणांचे अहवाल निगेटीव्ह आले होते. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या १४५ झाली असून त्यापैकी १०४ जण बरे झाले आहेत तर ३६ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ५ जणांचा कोरोना उपचार सुरू असताना मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील ४ व उमरगा तालुक्यातील एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा मृत्यू दर ३.४४ टक्के आहे तर रुग्ण बरे होण्याचा दर ७१.७२ टक्के असल्याची माहिती डॉ. आदटराव यांनी दिली.
Read More प्रीतीचा खेळ संपला : फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ती सहज त्याला जाळ्यात ओढायची
कारी येथील रुग्ण ५ ते ६ दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झाल्यानंतर गावी गेला होता मात्र त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांचा मृत्यू झाला. या रुग्णाला दमा, मधुमेह व रक्तदाबाचा त्रास होता मात्र त्यांनी १० दिवस उपचार घेऊन कोरोनावर मात केली होती व डिस्चार्ज मिळाल्यावर त्यांचा मृत्यू झाला. तर कळंब तालुक्यातील पाथर्डी येथील रुग्ण हे पुणे येथून आल्यावर त्याला कळंब रुग्णालयात एॅडमिट केले होते मात्र त्याची स्तिथी गंभीर असल्याने त्याला उस्मानाबाद शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले होते मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या रुगणाला तापीसह लिव्हरचा त्रास होता. त्यामुळे या रुग्णाचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येणार असल्याची माहिती डॉ आदटराव यांनी दिली.