धाराशिव : रोजगार हमी योजनेअंतर्गत कळंब तालुक्यातील ईटकूर येथे सुरू असलेल्या विहिरीच्या कामावरील रोहयो मजूराचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या मजूराच्या वारसांना १३ लाख १० हजार ८२० रूपये नुकसान भरपाई देण्याच्या आदेश धाराशिव येथील दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) वी. यूव. चौधरी यांनी दिला आहे. या दाव्यामध्ये प्रतिवादी संबंधित शेतकरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी (कळंब), तहसीलदार कळंब, ग्राम रोजगार सेवक आदींना करण्यात आले होते.
अॅड. एस. एस. रितापुरे यांनी सांगितले की, कळंब तालुक्यातील ईटकूर येथील शेतकरी संजय मधुकर गंभीरे यांच्या शेतामध्ये २०१५ मध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून विहिरीचे काम सुरू होते. त्या कामावर ईटकूर येथील तानाजी रामकिसन आडसूळ हे रोहयो मजूर म्हणून कामाला होते. ११ जुलै २०१५ रोजी मजूर तानाजी आडसूळ हे रस्सीच्या सहाय्याने विहिरीत उतरत असताना रस्सी तुटल्याने उंचावरून पडून गंभीर जखमी झाले. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
ते मयत झाल्यानंतर मयतांच्या वारसांनी नुकसान भरपाई मिळावी म्हणून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, तहसीलदार व गटविकास अधिकारी कळंब यांच्याकडे वारंवार मागणी केली. परंतु त्यांच्या मागणीला शासकीय यंत्रणेने दाद दिली नाही व नुकसान भरपाईही दिली नाही.
त्यामुळे मयताचे वारसांनी अॅड. एस. एस. रितापुरे यांच्या मार्फत धाराशिव येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाने अॅड. रितापुरे यांनी मांडलेली बाजू ग्रा धरून मयतांच्या वारसांना ८ लाख ७३ हजार ८८० रूपये नुकसान भरपाई व दंड म्हणून ४ लाख ३६ हजार ९४० रूपये असे एकूण १३ लाख १० हजार ८२० रूपये अपघात घडलेल्या तारखेपासून दसादसे १२ टक्के व्याज दराने देण्याचे आदेश शासनाला दिले आहेत.