32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeउस्मानाबादरांजणी येथील प्लान्टचा दिला खोटा पाहणी अहवाल!

रांजणी येथील प्लान्टचा दिला खोटा पाहणी अहवाल!

एकमत ऑनलाईन

धनंजय पाटील उस्मानाबाद : कळंब-लातूर रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम करण्यासाठी ऐश्वर्या कन्स्ट्रक्शन कंपनीने रांजणी (ता. कळंब) येथे उभारण्यात आलेला दगड खदाण, स्टोन क्रशर व डांबर प्लान्ट नियमबाह्य व बेकायदेशिररित्या उभारला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्लान्टची पाहणी करण्यासाठी क्षेत्रिय अधिकारी एन. पी. दारसेवाड यांना पाठविले होते. त्यांनी ठेकेदाराशी आर्थिक हातमिळवणी करून खोटा पाहणी अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयाला सादर केल्याचे समोर आले आहे. एकमतच्या प्रतिनिधींनी रांजणीच्या प्लान्टला भेट देऊन पाहणी केली असता क्षेत्रिय अधिकाºयांनी सादर केलेला पाहणी अहवाल व प्लॅन्टवरील वस्तुस्थिती वेगळी असल्याचे दिसून आले आहे.

हायब्रीड अ­ॅन्युईटी प्रकल्पाअंतर्गत कळंब-लातूर रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम ऐश्वर्या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने करण्यात येत आहे. त्या कामासाठी कंपनीने रांजणी (ता. कळंब) गावाजवळ तोही पाण्याची टाकी व ऐन जिल्हा परिषद शाळेजवळ दगड खदाण, स्टोन क्रशर, डांबर प्लान्ट उभारला आहे. या प्लान्टमुळे शाळेतील विद्यार्थी, परिसरातील नागरिक यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. रस्ता कामाच्या अनुषंगाने एकमतने वृत्तमालिका सुरू करून जिल्हाधिकारी, तहसीलदार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयाचे लक्ष वेधले आहे. एकमतमध्ये दि. २६ जून २०२० रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची ळपान ५ वर  दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयाचे लातूर येथील अधिकारी व्यंकट शेळके यांनी रांजणी येथील ऐश्वर्या कंपनीने उभारलेल्या प्लॅन्टची स्थळपाहणी केली. त्यानंतर पाहणी अहवाल सादर करण्याचा आदेश क्षेत्रिय अधिकारी दारसेवाड यांना दिला होता.

त्या आदेशावरून दारसेवाड यांनी ३० जून रोजी रांजणी येथील प्लॅन्टची स्थळपाहणी करून १ जुलै रोजी त्यांच्या कार्यालयाला अहवाल सादर केला. त्यात रांजणी येथील ऐश्वर्या कंपनीच्या प्लॅन्टला ३० जून रोजी भेट दिली असता कंपनीने गट नंबर २३४ मध्ये प्लॅन्ट उभारणी केलेला दिसून आला. परंतु येथे प्रत्यक्षात उत्पादन घेतलेले नाही. तसेच जागेवर तशा खानाखुणा आढळल्या नाहीत. प्रत्यक्षात कंपनीने प्लॅन्ट उभारणीसाठी आवश्यक असणारी प्रमाणपत्रे दाखविलेली नाहीत. सदरील स्टोन क्रशरचे अंतर रांजणी गावच्या वस्तीपासून अंदाजे २१० मीटर इतके आहे. रांजणीची जिल्हा परिषद शाळा (वस्तीशाळा) स्टोन क्रशरपासून २१० मीटरवर आहे. शाळेजवळ पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी (आरसीसी) आहे. पाहणी दरम्यान शाळा बंद होती. शाळेचा परिसर खुला होता. शाळेच्या आवारात इतरत्र दगडाच्या धुळीचे कण आढळले नाहीत. स्टोन क्रशरच्या आजूबाजूच्या शेतातील पिकाची पाहणी केली असता पिकाच्या पानावर दगडाच्या धुळीचे कण आढळले नाहीत, असे म्हटले.

एकमतच्या प्रतिनिधींनी रविवारी (दि. ५) रांजणीच्या प्लॅन्टला भेट दिली. यावेळी ऐश्वर्या कंपनीच्या प्लॅन्टजवळ अवघ्या 50 मीटर अंतरावर जिल्हा परिषदेची शाळा व गावाला पाणी पुरवठा करणारी पाण्याची उंच टाकी आहे. शाळेजवळच ईदगाह वस्ती आहे. दगड खदाणीत रात्रीच्यावेळी दगडे काढण्यासाठी ब्लास्टिंग केले जाते. त्यावेळी लहान-मोठे दगड वस्तीतील घरावर, शाळेवर पडत असल्याचे नागरिकांनी सांगितले. ब्लास्टिंग करताना मोठमोठे आवाज होऊन घरे हादरत असून अनेकांच्या घरांना भेगा गेल्याचे नागरिकांनी सांगितले. स्टोन क्रशरची दगडाची धूळ शेतातील पिकावर, घरात येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गट नंबर २३४ मधील जवळपास ३ एकरात दगड खदाण असून आजपर्यंत हजारो ब्रास दगडाचे उत्खनन केल्याचे दिसते. स्टोन क्रशर चालू असून खडीचे मोठमोठे ढिगारे लागले आहेत. डांबर प्लॅन्टही सुरू असून रांजणी ते तांदुळजा दरम्यान रस्त्याच्या एका बाजूचे डांबरीकरणाचे काम झालेले आहे.

आमच्या जिवाला धोका
रांजणी येथील ईदगाह वस्ती येथील रहिवासी कांताबाई भिकाजी रोकडे यांनी सांगितले की आमच्या घराजवळ सुरू असलेल्या प्लान्टमुळे आमच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. ब्लास्टिंग करते वेळी मोठा आवाज होऊन लहान-मोठे दगड आमच्या घरावर पडतात. घराला भेगा पडल्या आहेत. जवळच शाळा असून विद्यार्थ्यांच्या जिवाला पण धोका आहे. हा प्लान्ट बंद करावा, अशी मागणी केली आहे.

पाहणी अहवाल आणि प्रत्यक्षातील स्थिती वेगळी
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रिय अधिकारी दारसेवाड यांनी सादर केलेला पाहणी अहवाल व प्रत्यक्ष वस्तुस्थिती पूर्णत: वेगळी असून दारसेवाड यांनी ऐश्वर्या कंपनीच्या ठेकेदाराशी आर्थिक हातमिळवणी करून खोटा व दिशाभूल करणारा पाहणी अहवाल सादर केला असल्याचे दिसते. दारसेवाड यांनी खोटा अहवाल सादर करून रांजणी येथील नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा व शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दारसेवाड यांची खातेनिहाय व लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करून गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी रांजणी येथील नागरिकांनी केली आहे.

Read More  ऐश्वर्या कंपनीचा रांजणी येथील प्लॅन्ट बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या