29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeउस्मानाबादभविष्यात लॉकडाऊन झाल्यास लोक रस्त्यावर उतरण्याची भिती

भविष्यात लॉकडाऊन झाल्यास लोक रस्त्यावर उतरण्याची भिती

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद (सुभाष कदम) : वाढत्या कोरोनाला पायबंद घाळण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय सरकारच्या विचाराधीन आहे. असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यामुळे सगळीकडे लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. अगोदरच उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हाधिका-यांनी कठोर निर्बंध लावल्यामुळे चहाची हॉटेल, पानटपरी चालक यासह अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. भविष्यात राज्यात लॉकडाऊन झाल्यास हातावर पोट असलेले छोटे-छोटे व्यावसायिक, मजूर, शेतकरी यांच्यावर वाईट वेळ येणार आहे. परिणामी हे नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात अचानकपणे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या कालावधीत मोठ्या महानगरासह लहान-मोठ्या शहरातील नागरिक, कामगार यांचे प्रचंड हाल झाले होते. संपूर्ण देशातील रेल्वे, एसटीबस सेवा, खाजगी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे कामानिमित्त आलेले परप्रांतीय, राज्यातील कामगार यांचे आपापल्या गावाकडे जाण्यासाठी प्रचंड हाल झाले होते. शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करून हजारो कामगार आपापल्या गावी परतले होते. लॉकडाऊनची स्थिती जास्तकाळ राहील्याने अनेक गरिबांवर उपासमारीची वेळ आली होती. केंद्र सरकारने देशातील गरिबांना नोव्हेबर महिन्यापर्यंत रेशन दुकानातून मोफत गहू, तांदूळ देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. परंतू महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने गरिबांना आवश्यक ती मदत केल्याचे दिसून आले नाही.

लॉकडाऊनमुळे सरकारी कर्मचारी वगळता खाजगी कंपनीत, कारखान्यात काम करणा-या कामगारांना कामावरून कमी करण्यात आले होते. राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचारी यांनाही बससेवा बंद असल्याने अनेक महिने पगार मिळाला नाही. त्यामुळे त्यांचेही प्रचंड हाल झाले होते. अचानक लॉकडाऊन झाल्याने व संपूर्ण देशातील वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात आल्याने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. भाजीपाला, फळे शेतकèयांना उकिरड्यावर फेकून द्यावे लागले होते. लाखो रुपये खर्च केलेला वाया गेला होता. हीच परिस्थिती पुन्हा निर्माण होत असल्याचे दिसत आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यामुळे जिल्हाधिका-यांनी परिस्थिती लक्षात घेऊन कडक निर्बंध लावले आहेत. शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग पुढील आदेशापर्यंत बंद ठेवले आहेत. मंगल कार्यालये, पानटप-या, चहाची हॉटेल बंद केली आहेत. अन्य हॉटेल, बार, रेस्टॉरंट यांना फक्त पार्सल सेवा पुरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. पानटप-या, चहाची हॉटेल बंद केल्याने हा व्यवसाय करणाèयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या व्यवसायिकांनी चोरून व्यवसाय सुरू केला आहे. पकडल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो व दंड होऊ शकतो याची जाणीव असतानाही नाविलाजास्तव या लोकांनी चोरून व्यवसाय करण्यास सुरूवात केली आहे. विविध प्रकारची दुकाने सकाळी ७ ते रात्री ७ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याने अनेकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.

दुकानाचे भाडे, लाईट बील, खर्च कसा भागवायचा याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊन काळात व्यवसायिकांना दुकाने बंद असतानाही भाडे, लाईटबील भरावे लागले. सरकारने कोणतीही मदत केली नाही. स्थानिक स्वराज्य संस्था या मध्ये नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींनी कोणत्याही दुकानाचे भाडे कमी अथवा माफ केले नाही. त्यामुळे अनेक व्यवसायिक आर्थिक संकटात सापडलेले आहेत.

सध्या राज्यात लॉकडाऊनची चर्चा सुरू असल्याने कामानिमित्त मोठ्या शहरात गेलेले गावाकडील नागरिक हाल गेल्यावर्षीसारखे हाल होऊ नये म्हणून आपापल्या गावाकडे परतत आहेत. हातावर पोट असलेले नागरिक भविष्याची चिंता करू लागले आहेत. शेतकरी संभाव्य नुकसानीचा विचार करू लागले आहेत. भविष्यात लॉकडाऊन झालाच तर नागरिकांच्या सहनशिलतेचा उद्रेक होऊन नागरिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरकारने सर्व घटकांचा विचार करून लॉकडाऊन बाबतचा निर्णय घेण्याची गरज आहे.

औरंगाबाद शहराच्या प्रवेशस्थळांवरच कोरोना चाचणी; ६३ बाधित सापडले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या