उस्मानाबाद (धनंजय पाटील): जिल्ह्यातील मध्यम लोकसंख्या असलेल्या बहुतांश गावात बोगस बंगाली डॉक्टरांनी दुकाने थाटली होती. परंतु देशव्यापी लॉकडाऊनच्या काळात हे बोगस डॉक्टर आपापल्या राज्यात गेले होते. त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून जिल्ह्यातील नागरिक बोगस डॉक्टरांच्या विळख्यातून सुटले होते. आता अनलॉक सुरू असल्याने बोगस डॉक्टर जिल्ह्यात परतले असून त्यांनी ग्रामीण भागात आपला व्यवसाय सुरू केला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील घाटंग्री येथे एका बोगस बंगाली डॉक्टरने वैद्यकीय व्यवसाय करण्याचा कोणताही परवाना नसताना व वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतलेले नसताना गावातील नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे.
जिल्ह्यात जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी सरकारी दवाखाने आहेत. तर मोठी लोकसंख्या असलेल्या गावात जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. काही गावात आरोग्य उपकेंद्र आहेत. मोठ्या सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अधिका-यांची संख्या पुरेशा प्रमाणात असली तरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिका-यांची नियुक्ती आहे. आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. उपकेंद्रात फक्त आरोग्यसेविका यांची नियुक्ती आहे. ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात सरकारी आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याने व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात अशिक्षित असल्याने या संधीचा फायदा घेऊन बोगस बंगाली डॉक्टरांनी जिल्ह्यातील विविध गावात दवाखाने थाटले आहेत.
अशा बोगस डॉक्टरांवर आजपर्यंत मोठी कारवाई झाली नसल्याने बोगस डॉक्टरांचे फावले आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाची लक्षणे अनेकांना असतानाही भितीपोटी नागरिक सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल न होता बोगस बंगाली डॉक्टरांकडून उपचार घेत आहेत. काही बोगस डॉक्टर घरोघरी जाऊन नागरिकांवर उपचार करीत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात रुग्णांच्या जीवाशी खेळणा-या बोगस डॉक्टरांविरुद्ध जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी पथकांची निर्मिती करून कठोर कारवाई करावी व संबंधित बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी होत आहे.
सांगलीच्या जिल्हाधिका-यांनी बोगस डॉक्टरांच्या विरोधात मोहिम उघडली असून कोणत्याही गावात बोगस डॉक्टर आढळून आल्यास संबंधित गावातील सरपंच व ग्रामसेवकांना जबाबदार धरले जात आहे. वैद्यकीय शिक्षण नसताना अनेकांनी ग्रामीण भागात अवैधपणे दवाखाने सुरु केले आहेत. ग्रामीण भागात स्थानिक ग्रामपंचायतीच्या पदाधिका-यांना हाताशी धरून बोगस डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करण्याची लेखी qकवा तोंडी परवानगी घेतात. अशी परवानगी देताना त्या व्यक्तीची शैक्षणिक कागदपत्रे पाहिली जात नाहीत.
या बोगस डॉक्टरांचे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व तालुका जिल्हा पातळीवरील वैद्यकीय अधिका-यांशी लागेबांधे असतात. त्यामुळे बोगस डॉक्टरांच्या विरोधात कितीही तक्रारी आल्या तरी कारवाई होताना दिसत नाही. बोगस डॉक्टरावर कारवाई करण्याचे आदेश यापुर्वीच शासनाने दिलेले आहेत. जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुकास्तरीय अनाधिकृत वैद्यकीय व्यवसायिक शोध समिती यांनी बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
घाटंग्री येथील बोगस डॉक्टरवर कारवाई होईना घाटंग्री ता. उस्मानाबाद हे गाव जिल्हा मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद शहराच्या जवळ आहे. या गावात बंगाल येथील एक बोगस डॉक्टर गेल्या चार वर्षापासून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. या डॉक्टरला ग्रामपंचायतने गावात व्यवसाय करण्यास परवानगी दिलेली नाही. परंतू गावातील अशिक्षित व अडाणी लोकांचा पाठींबा असल्याने या डॉक्टरचा धंदा बिनबोभाटपणे सुरू आहे.
गावातील डॉ. ज्योती कानडे यांनी गावात व्यवसाय करून नागरिकांच्या जीवाशी खेळणा-या बोगस डॉक्टरव कारवाई करण्याची मागणी अनेक वेळा जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, पोलिस अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, पोहनेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे केली आहे. परंतू अद्यापही बोगस डॉक्टरवर कसल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. हा डॉक्टरमध्ये लॉकडाऊनमध्ये त्याच्या राज्यात गेला होता. तो आता परत आला असून त्याने घाटंग्री गावात व्यवसाय सुरू केला आहे.
मराठा आरक्षणावरील स्थगिती तत्काळ उठवा, नौकरभरती थांबवा