उस्मानाबाद : उपविभागीय अधिका-यांकडून शहरातील ज्या गल्लीत कोरोनाचा रुग्ण सापडला त्या भागात तर ग्रामीण भागात संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन जाहीर केले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेकडून नावालाच तो भाग सील केल्याचे दाखविले जात आहे.
परंतू कंटेनमेंट भागात राहणा-या नागरिकांच्या हालचालीवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने नागरिकांचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी अचानक शहरातील व ग्रामीण भागातील कंटेनमेंट झोनची पाहणी केल्यास रुग्णवाढीचे खरे कारण लक्षात येणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण नसताना सुरूवातीच्या काळात कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाया करण्यात आल्या. आता जिल्ह्यात दररोज १५० ते २०० रुग्ण आढळून येत असताना जिल्ह्यातील सर्व भागातील बाजारपेठ सुरू आहे. एका-एका घरात व एका-एका गावात मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत. शहरी भागातील ज्या गल्लीत रुग्ण सापडला जातो त्या भागात मर्यादित कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात येतो.
नगर परिषद त्या गल्लीतील फक्त दोन रस्त्यांना अडथळे लावून एखादा होमगार्ड बंदोबस्तावर ठेवला जातो. त्या गल्लीत येणारे अन्य रस्ते मोकळे असतात. त्यामुळे कंटेनमेंट झोन जाहीर झालेल्या भागातील नागरिक बिनधास्तपणे शहरातील विविध भागात कोरोना वाहक म्हणून फिरतात. ग्रामीण भागात तर विचित्र परिस्थिती आहे. तेर, ढोकी सारख्या २५ हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या गावात संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले असले तरी रुग्ण सापडलेल्या घराजवळ अडथळे लावून एखादा होमगार्ड बंदोबस्तावर असतो.
गावातील अन्य नागरिकांच्या हालचालीवर qकवा फिरण्यावर कोणतेही बंधन नाही. दुकाने सुद्धा सतत उघडी असतात. ग्रामीण भागात शेतकरी व मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने व सध्या शेतीची कामे सुरू असल्याने त्यांना कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे कंटेनमेंट झोन जाहीर असले तरी रुग्णसंख्या कमी न होता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तेर या गावात आतापर्यंत तीनवेळा कंटेनमेंट झोन म्हणून संपूर्ण गाव जाहीर करण्यात आले आहे. शहरी भागातही एक-एक गल्ली तीन-चारवेळा कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर झाली आहे. रुग्ण संख्या कमी करायची असेल तर प्रशासनाने कंटेनमेंट भागात कठोर नियमांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. अन्यथा एक-दोन वर्ष कोरोनाशी मुकाबला करावा लागणार आहे.
जिल्हाधिका-यांनी भेटी देण्याची गरज
कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी कंटेनमेंट झोनमध्ये नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. कोविड टेस्ट करण्यावर लाखो रुपये सध्या खर्च होत आहेत. हे वाचविण्यासाठी व रुग्ण संख्या कमी करण्यासाठी जिल्हाधिकाèयांनी अचानक कंटेनमेंट झोनला भेटी देऊन आढावा घेण्याची गरज आहे.