तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरात येणा-या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, या भाविकांना सुलभ दर्शन घडवून मुलभुत सुविधा पुरविण्याच्या बाबतीत प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
तिर्थक्षेत्र तुळजापूरच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच उन्हाळ्यात लाखो भाविक दर्शनासाठी आले. मंगळवार, शुक्रवार, रविवार, पौर्णिमा या दिवशी भाविकांची गर्दी असायची. सध्या दररोज मोठ्या संखेने भाविक दर्शनासाठी येत असल्याने, या वाढत्या भाविकांना सुलभ दर्शन देणे, मुलभुत सुविधा पुरवणे, स्वछता राखणे या बाबतीत प्रशासनावर प्रचंड ताण येत आहे. गर्दीच्या दिवशी मंदीर सलग बावीस तास दर्शनार्थ खुले ठेवूनही भाविकांच्या संख्येत घट होण्याऐवजी वाढच होत आहे.
तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत भाविकांना मुलभुत सुविधा मिळाव्यात या हेतूने करण्यात आलेली विकास कामे वाढत्या भाविकांंच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर अपुरी पडत असल्याने भाविकांना पैसे देवून साध्या मुलभूत सुविधा विकत घ्याव्या लागत आहेत.
तुळजाभवानी मंदिर प्रशासनास भाविकांना दर्शन देताना प्रचंड तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या व्हीआयपी दर्शनार्थ भाविकांचा ओघ वाढल्यामुळे व्हीआयपींना दर्शन घडविणे प्रशासनासाठी त्रासदायक ठरत आहे. त्यांचा मानसन्मान राखताना सामान्य भाविकांना सुलभ दर्शन देणे कठीण बनत आहे.
धर्म रांगेतून आलेल्या भाविकांना देवीचे सुलभ दर्शन घडत नसल्याचा तक्रारी भाविकांमधून वाढत आहेत. व्हीआयपी व पेडदर्शन वाल्यांच्या नंतरच आपल्याला दर्शन मिळत असल्याचा आरोप दोन ते तीन तास दर्शन मंडपातून धर्म दर्शन रांगेतून आलेल्या भाविकांकडून केला जात आहे. एरवी मंगळवार, शुक्रवार, रविवार, पोर्णिमा दिवशी मोठ्या संख्येने भाविक येत होते. आता इतर दिवशीही भाविक प्रचंड संख्येने येत आहेत. यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. त्यामुळे प्रशासनावरील ताण वाढला आहे.
दोन वर्ष कोरोना महामारीमुळे मंदिर बंद होते. आता पुन्हा कोरोना रुग्ण सापडत असल्यामुळे भाविक पुन्हा मंदिर बंद होण्याच्या शक्यतेने देवीदर्शनार्थ सहकुंटुंब गर्दी करीत आहेत. हा भाविकांचा प्रचंड ओघ १५ जूनपर्यंत असाच राहण्याची शक्यता आहे.
भाविकांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर भाविकांना मुलभूत सुविधाही उपलब्ध होत नसल्याने तिर्थक्षेत्र तुळजापुरात नव्याने विकास कामे करण्याची गरज निर्माण झाली आहे.