24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeउस्मानाबादउमरगा तालुक्यात वाहन चोरींच्या घटनांमध्ये वाढ ?

उमरगा तालुक्यात वाहन चोरींच्या घटनांमध्ये वाढ ?

एकमत ऑनलाईन

उमरगा : तालुक्यात मागील चार महिन्यापासून वाहनांच्या चो-यांचे प्रमाण वाढले असून परसरातील वाहनधारक धास्तावले आहेत . त्यात पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करून तसेच वाहनधारकाच्या संपर्कात येऊन चावी चोरी करून वाहन पळवत असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगत आहेत .

नुकतेच शहरातून जाणा-या महामार्गावर उभा असलेला ट्रक चोरीला गेला असून मागील सप्ताहभरापासून संबंधित ट्रक मालक गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करीत होते . पण वाहनावरील असलेल्या कर्ज बोजा साठी तुम्हीच वाहन गायब केले असेल असा संशय व्यक्त करून पोलिस चौकशी करून गुन्हा दाखल करू अशी भूमिका घेत होते.

तर दि .१८ रोजी गुंजोटी येथून उमरगा येथील एका व्यापा-याची नवीन स्कॉर्पिओ जीप तोतया पोलिसांने पळवल्याची घटना घडली आहे . शहर व परिसरातून आठवड्या दोन आठवड्यातून मोटरसायकल चोरीच्या घटना सातत्याने घडत असतात. याबाबत काही वाहनधारक तक्रार दाखल करतात तर काही जुन्या गाड्यांचे वाहनधारक व कमी कागदपत्रे असणारे तक्रार दाखल करण्याचे टाळतात . तर अनेक वेळा पोलीस प्रशासन याबाबत टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे या संधीचा फायदा वाहन चोरांना होत आहे .
———–
माझी स्कॉर्पिओ मॉडेलची गाडी क्रमांक एम एच २५ -११३४ गुंजोटी येथून दिनांक १८ रोजी रात्री १० .०० वाजता एका अज्ञात व्यक्तीने पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करून माझ्या ड्रायव्हरला गुंगारा देऊन गाडी चोरी केली आहे . याबाबत चौकशी व माहिती घेतली असता सीसीटीव्ही फुटेज मध्ये सदरील व्यक्ती दिसत असून कर्नाटक क्षेत्रामध्ये त्याच्यावर गुन्हेगारी गुन्हे दाखल असल्याचे समजते. या घटनेला बहात्तर तास उलटूनही प्रशासनाने गुन्हा दाखल केलेला नाही . अशी माहिती बालाजी केशवशेट्टी यांनी दिली.

पोलिसाचे ओळखपत्र दाखवून केली चोरी

गुंजोटी येथून स्कॉर्पिओ गाडी चोरी प्रकरणातील गुन्हेगार सीसीटीव्ही फुटेज मधील चित्रावरून काही व्यक्तींनी कर्नाटक क्षेत्रामध्ये असल्याचा संशय व्यक्त केला आहे . तो सराईत गुन्हेगार असल्याचे निदर्शनास येत आहे . सदरील व्यक्तीने स्कॉर्पिओच्या वाहन चालकास आपण पोलीस अधिकारी असल्याचे ओळखपत्र दाखवून गुंजोटी येथे सोडण्याची विनंती केली .गुंजोटी येथील सीसीटीव्ही फुटेज मध्ये सदरील व्यक्ती दिसत असून ड्रायव्हरची चावी चोरी करून वाहन चोरी केली .

शहरातील सीसीटीव्हीची बंद यंत्रणा कार्यान्वित करण्याची आवश्यकता

उमरगा शहरामध्ये लोकवाट्यातून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती, पण देखभाल दुरुस्ती अभावी सदरील यंत्रणा बंद पडली असून या दुरुस्तीसाठी खर्च कोण करणार यासाठी नगरपरिषद, पोलीस स्टेशन व प्रशासन यांच्यातील दिरंगाईमुळे गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या सर्व सीसीटीव्ही थेट पोलीस स्टेशन येथे जोडण्यात आलेल्या असून ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यास गुन्हा उघडकीस येण्याचे प्रमाण वाढणार आहे व पोलीस प्रशासनाला याची मोठी मदत होणार आहे . याबाबत लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन यंत्रणा कार्यान्वित करावी अशी चर्चा सामान्य नागरिकांतून होत आहे .

———
वाहन चोरीला गेल्यानंतर तात्काळ पोलिसांनी एफ आय आर दाखल करणे आवश्यक आहे . त्वरित तपासाची चक्रे फिरवल्यास चोरीचे वाहन सापडण्यास चांगली मदत होऊ शकते . व्यक्ती हरवल्यास त्यासाठी ४८ तासाचा अवधी योग्य असला तरी तो वाहनासाठी लागू करणे योग्य नाही .
— अ‍ॅड . इब्राहीम भैय्या शेख ( विधीज्ञ उमरगा )

———
वाहन चोरी प्रतिबंधासाठी उपायोजना केल्या असून
रस्त्यावर वाहन सोडून जाणा-या वाहनधारकांची वाहने पोलीस स्टेशनला आणली जात आहेत. परिवहन आगारालाही सुचना दिल्या आहेत , त्याचबरोबर व्यापा-यांना सीसीटीव्ही बसवण्यास सुचीत केले आहे . तपास कार्यासाठी पोलीस कर्मचा-यांची संख्या कमी असल्याने यंत्रणेवर ताण येत आहे. अनेक व्यापा-यांनी सीसीटीव्ही बसवल्याने गुन्हे नियंत्रणात येत आहेत .

— श्री . मनोजकुमार राठोड ( पोलीस निरीक्षक उमरगा )

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या