वाशी : सरपंचपदाचा राजीनामा देण्याच्या कारणावरून व जुना वाद उकरून काढत वाशी ता. इंदापूर येथील सरपंच गणेश विजयकुमार गपाट यांच्यावर १६ जणांनी जीवघेणा हल्ला केला. लोखंडी टामी, काठी व कत्तीने मारहाण करून गंभीर जखमी केले.
ही घटना ४ जून रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास इंदापूर येथे घडली आहे. या प्रकरणी जखमी गणेश गपाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १६ जणांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदापूर, ता. वाशी येथील गणेश विजयकुमार गपाट हे गावचे सरपंच आहेत. जुना वाद उकरून व सरपंचपदाचा राजीनामा देण्याच्या कारणावरुन दि. ४ जून रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास सरपंच गणेश गपाट यांच्यावर इंदापूर येथे १६ जणांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. गावातील व भावकीतील पिंटु गपाट, पृथ्वीराज गपाट, अशोक गपाट, समाधान पाटील, प्रशांत गपाट, बालाजी मोरे, गणेश पाटील, रामराजे गपाट, शुभम गपाट, योगेश पखाले, विशाल कुंभार यांच्यासह पाच अनोळखी लोकांनी सरपंच गणेश यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली.
तसेच ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी टामी, कत्ती व काठीने गणेश गपाट यांना मारहाण करुन गंभीर जखमी केले. दरम्यान गणेश गपाट हे आपल्या बचावासाठी जवळील पारडे यांच्या घरात शिरले असता या लोकांनी पारडे यांच्या घराच्या खिडक्या फोडून नुकसान केले. यावेळी गणेश यांच्या बचावास आलेल्या त्यांच्या आई-वडीलांसही या लोकांनी मारहान केली.
यावेळी निलेश चोपडे यांना त्यांच्या घरात घूसून मारहान करुन घरासमोरील कारच्या काचा फोडून नुकसान केले. या प्रकरणी गणेश गपाट यांनी दि. ५ जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- ३०७, ३२६, ३२४, ४५२, ४२७, १४३, १४८, १४९, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.