कळंब : कळंब नगर पालिकेने कोरोना रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नगर पालिकेच्या सोमवारी (दि.१४) झालेल्या सर्वसाधारण सभेत एकूण चौदा ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. त्यामध्ये प्लाझ्मा देणारांसाठी टेस्टचा खर्च देणार आहे. याशिवाय शहरात महिला, पुरुषांसाठी टायलेट, शहरातील व्यापाèयांसाठी गाळ्यांच्या भाडे वाढीसाठी ९ वर्षाची मुदतवाढ देणे आदी १४ ठरावांना मंजुरी देण्यात आली आहे.
या सभेस नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे, उपाध्यक्ष संजय मुंदडा, विरोधी पक्षनेते शिवाजी कापसे, मुख्याधिकारी देवीदास जाधव यांच्यासह नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते यात प्रामुख्याने कोरोनाच्या धर्तीवर कोरोना पॉझीटीव्ह होऊन गेलेल्या व्यक्तींच्या शरीरात अँटिबॉडी तयार होते. जी किमान तीन महिने टिकते. या अँटिबॉडी प्लाझ्माद्वारे घेऊन कोरोनाच्या अत्यवस्थ रूग्णाला दिल्यास त्यांना त्याचा अमाप फायदा होतो. अँटिबॉडी प्लाझ्मा हा कोरोना विरोधी लसचे काम करते. त्यामुळे अत्यवस्थ रूग्णाला जीवदान मिळते.
कळंब शहरासह तालुक्यातील कोरोना होऊन गेलेल्या रूग्णांची अँटिबॉडीज टेस्टसाठी प्रयोगशाळेत एक हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. ती टेस्ट नगर पालिका स्वतःच्या निधीतून करेल. व अँटिबॉडीज तयार झालेल्या लोकांची यादी बनवून अत्यवस्थ पेशंटला प्लाझ्मा उपलब्ध करून देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या प्रकारे प्लाझ्मा डोनेशनसाठी स्वखर्चाने पुढाकार घेणारी महाराष्ट्रातील पहिली नगर पालिका म्हणून कळंब नगर पालिका ठरली आहे.
त्याचबरोबर शहरात आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक व होळकर चौकामध्ये टाटा कंपनीचे ई-टॉयलेट महिला व पुरूषांसाठी वेगवेगळे बसवण्याच्या टेन्डरलाही मान्यता देण्यात आली. यामुळे अॅटोमॅटीक स्वच्छ होणारे टॉयलेट शहरवासियांना येत्या दोन महिन्यात उपलब्ध होतील. असे ई-टॉयलेट स्थापित करणारी मराठवाड्यातील कळंब नगर पालिका ही पहिली ठरली आहे. सातत्याने गाळ्याची मुदत संपली की ऑक्सीजनवर राहणा-या व्यापारी बंधूंना २०११ च्या परिपत्रकाच्या आधारावर इथून पुढे ९ वर्षाची मुदतवाढ जिल्हाधिकारी यांच्या संमतीने देण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला.
रितसर प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात येईल त्यानंतर जिल्हाधिकारी हे भाडेनिश्चीती करून त्याच व्यापारी बंधूंना पुढिल नऊ वर्षे नुतनीकरण करण्यास परवानगी देतील. याच बरोबर शहरातील मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी विद्युत शवदाहीनी घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. हे सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.