उस्मानाबाद : २०२२ या वर्षात सततचा पाऊस व अतिवृष्टी होऊन शेतक-यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. परंतू उस्मानाबाद तालुक्यातील अनेक गावातील शेतक-यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही. अतिवृष्टीचे अनुदान तातडीने द्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उस्मानाबाद तालुक्यातील सोनेगाव फाटा येथे बुधवारी (दि.१) मार्च रोजी जमिनीत गाढून घेऊन आंदोलन सुरू केले आहे.
उस्मानाबाद जिल् ता खरिप २०२२ मध्ये सततचा पाऊस व अतिवृष्टीने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने अतिवृष्टीचे अनुदान दुप्पट देण्याचे जाहीर केले. दिवाळीपुर्वी अनुदान शेतक-यांच्या खात्यावर जमा होईल, असे सांगितले.
परंतु प्रत्यक्षात शेतक-यांना अनुदान मिळाले नाही. त्यामुळे जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद तालुक्यातील सोनेगाव फाटा येथे शेतक-यांनी स्वत:ला जमिनीत गाढून घेतले आहे. अतिवृष्टीने अनुदान तातडीने द्यावे, २०२२-२३ चा पिकविमा लवकर शेतक-यांच्या खात्यावर जमा करावा, कांदा पिकाला हमी भाव द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्या शेतक-यांनी केली आहे. सरकारने लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे शेतक-यांनी यावेळी सांगितले.