करमाळा : जमीन मालकाच्या परवानगीशिवाय बनावट नोटरी करून त्यावर जमिनीचा व्यवहार करण्यासाठी सुरुवातीचे दहा लाख रुपये घेतल्याची नोंद केल्याप्रकरणी एकावर करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सोहेल अब्बास शेख (रा. करमाळा) असे संशयित आरोपीचे नाव असून, याप्रकरणी डॉ. वैशाली प्रकाश मेहता (४५ रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
वैशाली मेहता यांचे करमाळ््यात माहेर आहे. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर करमाळा येथील सिटी सर्व्हे नंबर २७१२/ ब ही जागा वैशाली यांच्या नावे झाली होती. ही जागा मुख्य चौकात असल्याने त्या जागेला मोठ्या प्रमाणावर मागणी होती. जागेची माहिती घेण्यासाठी मेहता करमाळा येथे आल्यानंतर घराचे लाइट कनेक्शन हे आपल्या नावे व्हावे, यासाठी शेख याने तहसील कार्यालयाकडे अर्ज केल्याचे दिसून आले. त्यावरून सदर प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, सोहेल यास बोलावले असता त्याने त्याच्याकडील ११ एप्रिल २०२२ रोजीची नोटरी दाखवली. या नोटरीवर दहा लाख रूपये अॅडव्हान्स म्हणून दिल्याचे लिहिण्यात आले होते. परंतु त्यादिवशी आपण करमाळा तालुक्यात आलेच नव्हतो, असे मेहता यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्या नोटरीवर बनावट स्वाक्षरी, फोटो लावून नोटरी केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर नोटरीवर साक्षीदार म्हणून तुषार शिंदे (पोथरे) व फत्तू शेख (रा. खोलेश्वर) यांची नावे आहेत.