उमरगा : तालुक्यातून जाणार्या मुंबई-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील बलसूर पाटी येथे खासगी ट्रॅव्हल्स व सहा चाकी कंटेनर यांचा गुरूवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात कंटेनर चालक जागीच ठार झाला असून बसमधील दहाजण गंभीर जखमी झाले आहेत.
उमरगा तालुक्यातील जकेकूर चौरस्ता येथून पुणे येथे जाण्यासाठी निघालेली खासगी ट्रॅव्हल्स (क्रमांक एमएच ०९/सीव्ही/३६९९) ही बलसूर पाटीनजीक आली असता समोरून चुकीच्या मार्गाने आलेल्या कंटेनरने (क्रमांक एमएच ४६/ बीबी/७९६५) ट्रॅव्हल्सला जोराची धडक दिली. यात कंटेनर चालक राजेंद्र शिवराम गेजगे (वय ४५ वर्षे रा. दाळिंब) यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर बसमधील दहा प्रवाशी जखमी झाले आहेत. ही घटना गुरूवारी (दि.२१)रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती कळताच चौरस्ता येथील नरेंद्र महाराज संस्थानच्या अॅम्ब्युलन्सने जखमींना उपचारासाठी तात्काळ जिल्हा रूग्णालय उमरगा येथे हलविण्यात आले आहे.
जखमींमध्ये शांताबाई यशवंत चिंचोरकर (वय ५० वर्षे रा. पुणे), रेश्मा सुनिल गायकवाड (वय २३), सुनिल गोरोबा गायकवाड (वय ३०), बाबाजी मगर कांबळे (वय २६ रा. नागराळ ता. उमरगा), रामलिंग मनोहर कुंभार (वय २५ वर्षे, रा. नाईचाकूर), सानवी रमेश कोठमाळे (वय ७, रा. पुणे), राजु यशवंत चिंचोरकर (वय ३५, रा.पुणे), मनोज नामदेव भुसे (वय २९, रा. लातूर), अरूण बाबू पवार (वय ३३, रा. घोगी सांगवी ता. शिरूर अनंतपाळ), बबन महादेव जांभळे (वय ३६, रा. गणेशवाडी ता. लातूर) यांचा समावेश आहे.
अपघाताची माहिती कळताच उमरगा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक समाधान कवडे आपल्या यूनिटसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी जखमींना बाहेर काढण्यासाठी जकेकूरचे सरपंच अनिल बिराजदार, किशोर बिराजदार, दत्ता पवार, राजू वाकळे, चंद्रकांत कांबळे, राजेंद्र सोनकांबळे, एजाज पठाण आदी ग्रामस्थांनी प्रयत्न केले.