उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरात दररोजच वेगवेगळ्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी १३ ते १९ जुलै अशी सात दिवस संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान, शहरात संचारबंदी लागू केली असली तरी जीवनावश्यक वस्तुच्या नावाखाली बहुतांश आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी औरंगाबादप्रमाणे कडक संचारबंदीचे आदेश पुन्हा काढावेत, अशी मागणी शहरातील नागरिकांतून होत आहे.
उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यात दररोज कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी उस्मानाबाद शहर मर्यादित १३ ते १९ जुलै या कालावधित सात दिवसाची संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी काळात शहरातील सर्व किराणा दुकाने, दवाखाने, मेडीकल दुकाने, चष्मा दुकाने, पशुवैद्यकीय सेवा, अंडी, मटन, चिकन, दुध व दुग्धजन्य दुकाने, ब्रेड, फळ विक्री दुकाने सुरू राहणार आहेत. अत्यावश्यक मालवाहतूक सुरू राहणार आहे.
भाजी विक्रेत्यांना एकाजागी बसून भाजी विकता येणार नाही, त्यांनी गल्लीत फिरून भाजी विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शहरातील सर्व प्रकारची बांधकामे सुरू राहतील. सर्व बँका व एटीएम सुरू राहतील. वर्तमानपत्रे व माध्यमविषयक सेवा सुरू राहणार आहेत. शासकीय कार्यालये, न्यायालय कामकाज सुरू राहील. कृषी उत्पन्न बाजार समिती, विद्युत सेवा, मोबाईल व दुरसंचार सेवा पुरविणा-या कंपन्या सुरू राहतील.
पेट्रोल व डीझेलपंप सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत सुरू राहतील. परंतू अत्यावश्यक सेवा देणा-या कर्मचा-यांनाच ओळखपत्र दाखवून इंधनाची विक्री केली जाईल. पोलिस वेलफेअर पेट्रोलपंप २४ तास सुरू राहील. एमआयडीसी मधील कंपन्या सुरूच राहतील. संचारबंदी काळात प्रशासनाच्या पुर्वपरवानगीशिवाय यात्रा, मेळावे, धार्मिक कार्यक्रम करता येणार नाही. जिल्हाधिकाèयांच्या संचारबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी करावी, कोणत्याही नागरिकाने आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी औरंगाबाद शहरात १० ते १८ जुलै या काळात लॉकडाऊन करण्यात आला असून पहिल्यापेक्षा अतिशय कडक अंमलबजावणी केली जात आहे. किराणा दुकानासह सर्वच आस्थापना बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. फक्त दवाखाने व मेडीकल दुकाने, दूध विक्री सुरू राहणार आह-ेत. विनाकारण बाहेर फिरणाèयांचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द केला जाणार आहे. कडक लॉकडाऊन असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होणार आहे. मात्र उस्मानाबाद शहरात संचारबंदी लागू करण्यात येत असली तरी बहुतांश आस्थापना चालू राहणार असल्याने शहरात होणारी गर्दी कमी होईल असे वाटत नाही. त्यामुळे जिल्हाधिका-यांनी परत आदेश काढून औरंगाबाद शहराप्रमाणे कडक लॉकडाऊन करावा, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून होत आहे.
अनलॉकमध्ये वाढले कोरोनाचे रुग्ण
उस्मानाबाद जिल्ह्यात सुरूवातीच्या काळात कोरोनाचे फक्त तीन रुग्ण होते. उपचारानंतर तेही बरे झाले. लॉकडाऊन उठवून अनलॉक सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत गेली. आजअखेर जिल्ह्यात ३३३ रुग्ण संख्या झाली आहे. दररोज रुग्ण संख्येत वाढच होत चालली आहे. उस्मानाबाद शहरात रुग्ण वाढल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
Read More ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’!