उस्मानाबाद : लोहारा पोलिस स्टेशन येथील पोलिस नाईक गोरोबा बाबासाहेब इंगळे (वय ३५) यांना तक्रारदाराकडुन २० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरूवारी दि. ४ ऑगस्ट रोजी लोहारा ते जेवळी रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ करण्यात आली. या प्रकरणी लाचखोर पोलिसाच्या विरोधात लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे विरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्यांना अटक न करणे, लॉकअप मध्ये न टाकणे, चार्जशीट न पाठवणे व फायनल पाठवणे यासाठी पोलीस नाईक गोरोबा बाबासाहेब इंगळे यांनी तक्रारदाराकडे 3 ऑगस्ट रोजी 25 हजार रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती २० हजार रुपये लाच देण्याचे ठरले होते. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून गुरूवारी एसीबीच्या पोलीसांनी सापळा रचला होता. गुरूवारी दि. ४ ऑगस्ट रोजी २० हजार रूपयांची लाच घेताना पोलिस नाईक गोरोबा इंगळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांनी सापळा अधिकारी म्हणून काम केले. सापळा पथकात पोलिस अंमलदार इफ्तेकार शेख, दिनकर उगलमूगले, विष्णू बेळे, जाकेर काझी यांनी काम पाहिले.