24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeउस्मानाबादपोलिस पाटलांना सहकारी संस्थेच्या निवडणुका लढवता येणार..!

पोलिस पाटलांना सहकारी संस्थेच्या निवडणुका लढवता येणार..!

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : पोलिस पाटलांना सहकारी संस्थांच्या निवडणुका लढण्याबाबत, सहकारी संस्थेत पद घेण्याबाबत अनेक शंकाकुशंका होत्या. अनेक पोलिस पाटलांना सहकारी संस्थेत पद घेतल्याच्या तक्रारीनंतर अपात्र ठरवण्यात आल्याचे प्रकार घडले होते. मात्र आता तसे करता येणार नाही. कारण शासनाने परिपत्रक काढून पोलिस पाटलांना सहकारी संस्थेच्या निवडणुका लढवता येउ शकतील, असे स्पष्ट केले आहे.

पोलिस पाटील संघटनांच्या मागण्याबाबत गृहमंत्री यांच्याकडे ३ डिसेंबर २0२0 रोजी बैठक पार पडली. पोलिस पाटील सहकारी संस्थामध्ये निवडणूक लढवू शकतो, असे शासनपत्र असूनही ब-याच ठिकाणी नियुक्ती प्राधिकारी (जिल्हाधिकारी) पोलिस पाटील यांना निलंबित करतात या मुद्याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्याअनुषंगाने यासंदर्भात स्पष्टता आणण्याबाबत पोलिस पाटील संघटनांनी शासनाकडे मागणी केली होती.

मात्र, पोलिस पाटील हा गावातील शासनाचा निवासी प्रतिनिधी असतो. त्याच्या पदाचा दर्जा, कामाची भूमिका व जबाबदा-­या पाहता, त्यांनी राजकीय कार्यात सहभागी होणे, अपेक्षित नाही. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ च्या नियम ५ (१) नुसार पोलिस पाटील यांना राजकारणात भाग घेण्यापासून, विधानमंडळाच्या व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सहभाग घेण्यास प्रतिबंधित केले आहे.

पोलिस पाटील पदासाठीचा उमेदवार हा राजकीय पक्ष, संघटनेचा सदस्य किंवा त्यांच्याशी संलग्न असू नये. स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, सदस्य यांचा पोलिस पाटील पदासाठी उमेदवार म्हणून विचारात घेतले जाऊ शकतात. तथापि, त्या सर्व पदावरुन प्रत्यक्षात राजीनामा दिल्यानंतरच त्यांची नियुक्ती पोलिस पाटील पदावर केली जाऊ शकते, असे सांगण्यात येत होते.

मात्र, पोलिस पाटील यांना मानधन दिले जाते, वेतन नाही. त्यांना उपजिविकेचे साधन असणे अपेक्षित आहे. तो शेती, स्थानिक व्यवसाय किंवा व्यापार करीत असेल तर हे काम त्यांच्या पोलिस पाटील पदाच्या कर्तव्यास बाधा निर्माण करणारे असू नये. म्हणूनच त्याने कार्यरत असताना सहकारी संस्थेशी संबंध ठेवू नये, अशी अपेक्षा करणे अवास्तव आहे.

परिणामी पोलिस पाटील अथवा त्या पदाचा उमेदवार, सहकारी संस्थेचा सदस्य अथवा पदाधिकारी राहू शकतो किंवा त्यासाठी निवडणूक लढू शकतो. या संदर्भात शासकीय कर्मर्चा­यांस लागू असलेली महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ च्या नियम १६ (३) ची तरतूद पोलिस पाटील यांना लागू नाही.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६0 मधील कलम ७३ क, अ मध्ये समितीची आणि तिच्या सदस्यांची निरर्हता स्पष्ट करण्यात आली आहे. कलम ७३ क, अ मध्ये तसेच सदर अधिनियमातील इतर कलमांत देखील पोलिस पाटलांना सहकारी संस्थांच्या निवडणूका लढविण्यासाठी प्रतिबंध केल्याची तरतूद नाही. हे सर्व पाहता सर्व नियुक्ती प्राधिकारी यांना सूचित करण्यात येते की, सहकारी संस्थांची निवडणूक लढविणे किंवा त्यामध्ये पदाधिकारी म्हणून पद भूषविणे ही बाब पोलिस पाटील पदासाठी अपात्र ठरत नाही, असा शासन निर्णय काढण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या