तुळजापूर : तुळजापूर शहरातील हडको परिसरातील एका ठिकाणी तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी एक लाख ४६ हजार १४० रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. यावेळी ९ जण गळाला लागले. ही कारवाई सोमवारी (दि.१) तुळजापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे-पाटील यांनी केली. त्यामुळे तुळजापूर शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तुळजापूर शहरातील बोंबले चौक हडको येथील राज कोल्ड्रिंक्स या नावाच्या दुकानात पत्र्याच्या शेडमध्ये काही नागरीक पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळत आहेत. अशी माहिती गुप्तचरायामार्फत मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सई भोरे-पाटील यांच्या आदेशावरून उपविभागीय पोलिस पथकाने राज कोल्ड्रिंक्स या नावाच्या दुकानात पत्र्याच्या शेडमध्ये अचानक पोलिसांनी छापा टाकला. यावेळी याठिकाणी ९ जण गोल रिंगण करून पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळ खेळताना मिळून आले.
सदर इसमांना पोलिसांनी जागेवर पकडले व त्यांची समक्ष अंग झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातील नगदी रुपये व जुगाराचे साहित्य मिळून एक लाख ४६ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गिडवे यांच्या फिर्यादीवरून नऊ जणाविरुद्ध कलम ४,५ महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कारवाई उपविभागीय पोलिस पथकाचे पोलीस नाईक योगेश मांडोळे, पोलीस अमलादार गणेश आतकरे, पोलीस अमलादार बालाजी जाधव, पोलीस अमलादार ऋषिकेश गवळी, पोलीस अमलादार अमर माळी चालक, पोलीस अंमलदार एकनाथ नागरगोजे या पथकाने केली.