कळंब : सेवानिवृत्त क्रिडा उपसंचालक जनक टेकाळे व शिक्षक राजकुमार जटाळे यांनी उडी घेवून पाण्यात बुडणार्या माय-लेकरास जीवदान दिले आहे. ही घटना कळंब तालुक्यातील बोरगाव (समुद्रे) येथे नुकतीच घडली. यामुळे या दोघांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
कळंब तालुक्यातील बोरगाव (समुद्रे) येथील भारतमाता मंदिर शेजारील शेतात बोरगाव येथील दोन शेतमजूर महिला काम करत असताना त्यांची ७ ते १० वर्ष वयाची तीन लहान मुले मंदिर परिसरात खेळत होती. खेळता खेळता ते शेजारच्या शेतातील शेततळ्याकडे मासे पाहण्यासाठी गेली असता त्यातील सोहम राजाभाऊ जगधने (वय १०) हा मुलगा घसरून पाण्यात पडला.
पाणी १० ते १२ फूट खोल असल्याने तो बुडू लागला, तेंव्हा दुसर्या मुलांनी पळत जावून काही अंतरावर असलेल्या महिलांना आवाज दिला. त्या दोघी पळत गेल्या. त्यातील त्या मुलाची आई शितल राजाभाऊ जगधने हिने कोणताही विचार न करता तिच्यातील हिरकणीने त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र तिला पोहता येत नसल्याने तिहीं बुडू लागली.
दुसर्या महिलेने मंदिरा शेजारी चर्चा करत बसलेले क्रिडा व युवक संचालनालयाचे सेवानिवृत्त उपसंचालक जनक टेकाळे (वय ६२) व मुरुड येथील जनता विद्यालयातील सहशिक्षक राजकुमार तटाळे दोघेही कळंब तालुक्यातील पाडोळी येथील राहणारे यांना मोठ्याने आवाज दिला. तेव्हा दोघांनीही क्षणाचाही विलंब न करता दोघेही शेततळ्याच्या दिशेने धावत गेले.
तोपर्यंत तो मुलगा बुडून तळाला गेला होता. दोघांनीही पाण्यात उडी घेऊन प्रथम बुडणार्या महिलेस बाहेर काढले. त्यानंतर बुडालेल्या मुलाचा शोध घेऊ लागली, मात्र पाणी हिरवेगार व शेवाळलेले असल्यानं मूल सापडत नव्हते, तेंव्हा ते तटाळे सरांच्या पायास लागले व दोघांनी पाण्यात बुडी घेऊन त्यांस बाहेर काढले. मात्र मूल श्वसनक्रिया बंद पडून मृत अवस्थेत होते. तेंव्हा तटाळे सरांनी बाहेर येऊन मुलास शास्त्रीय पद्धतीने प्रथमोपचाराची सुरुवात केली.
प्रथम पालथे टाकून एक ते दोन मिनिटे पंपिंग व दाब देत पाणी काढण्याचा प्रयत्न केला. अगदी थोडेसेच पाणी बाहेर आले. दरम्यान मुलाचा आवाज आल्याने तटाळे सरांनी त्यास सरळ उथाने झोपवून छातीवर दोन ते तीन मिनिटे पंपिंग केले. आश्चर्य, मुलाने मोठा श्वास घेतला. नंतर मुलाने अर्धवट झाकलेले डोळे पूर्णपणे उघडले. सरांनी मुलाच्या छातीची धडधड ऐकली आणि इतरांना मुलांचे तळहात व तळपाय घर्षण करण्यास सांगितले. कांही वेळाने मुलाने उलटी केली व त्यास पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.
राज्यात क्रिडा क्षेत्रात एवढ्या मोठ्या पदावर काम करणारे टेकाळे यांनी व सहशिक्षक तटाळे यांनी प्रसंगावधान राखत दोन जिव वाचविले. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.