उस्मानाबाद : आ. तानाजीराव सावंत यांच्या समर्थनात अखिल भारतीय छावा संघटना रस्त्यावर उतरली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे खा. संजय राऊत यांच्या प्रतिमेला काळे फासून जोडे मारत तीव्र निषेध व्यक्त केला. या राऊताचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय अशा घोषणा कार्यकर्त्यांनी देऊन मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहणारे आ. सावंत यांचा अवमान यापुढे कदापी खपवून घेणार नाही, याचे भान खासदार राऊत यांनी ठेवावे, असा इशारा यावेळी दिला. शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी आ. तानाजीराव सावंत यांच्याविषयी अवमानकारक उद्गार काढल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ साळुंके म्हणाले, मराठा आरक्षणाच्या लढ्यात ४२ जणांनी बलिदान दिले. तेंव्हा एकमेव आमदार तानाजीराव सावंत यांनी पुढे येऊन हुतात्म्यांच्या कुटूंबियांना आर्थिक सहकार्य करुन मदत केली होती. याउलट मराठा मोर्चाची बदनामी करणार्या संजय राऊत यांनी आ. तानाजीराव सावंत यांना सूर्याजी पिसाळाची उपमा देऊन अवमान केल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. मराठा समाजाच्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला काळे फासून जोडले हाणून आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनात छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, युवक जिल्हाध्यक्ष कालिदास गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ साळुंके, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष रोहित पाटील, मराठवाडा सोशल मीडियाचे वासुदेव पाचंगे, योगेश मोरे, प्रेम म्हेत्रे, धनंजय शिंदे यांच्यासह छावाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.