27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeउस्मानाबादसांगलीच्या संकेतने पटकावले रौप्य पदक

सांगलीच्या संकेतने पटकावले रौप्य पदक

एकमत ऑनलाईन

बर्मिंगहॅम : बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या दुस-या दिवशी सांगलीच्या संकेत सरगर याने भारताला पहिले पदक जिंकून या स्पर्धेत आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला. ५५ किलो वजनी गटात त्याने रौप्य पदकाला गवसणी घातली. त्याच्या या यशाने सांगलीसह महाराष्ट्राची छाती अभिमानाने फुलली आहे. यासोबतच आणखी एक भारतीय वेटलिफ्टर गुरुराजा पुजारीने बाजी मारत कांस्य पदकाला गवसणी घातली. २९ वर्षीय पुजारीने पुरुषांच्या ६१ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. त्यामुळे दुस-या दिवशी भारताने २ पदकांची कमाई केली.

सांगलीचा संकेत सरगर हा अत्यंत गरीब कुटुंबातील क्रीडापटू आहे. त्यामुळे त्याच्या यशाला गरिबी, अठरा विश्व दारिद्रयाची झालर आहे. घरची गरिबीची परिस्थिती असल्याने त्याला आपल्या वडिलांच्या पानाच्या टपरीवर बसावे लागत असे. त्याने पानाच्या टपरीवर बसून सुवर्णपदकाचे स्वप्न पाहिले. त्यादृष्टीने जिद्दीने कष्ट केले. मात्र, त्याचे सुवर्णपदकाचे स्वप्न थोडक्यात हुकले. मात्र, या स्पर्धेत त्याने भारताला पहिले पदक मिळवून देऊन देशाची मान अभिमानाने ताठ केली आहे.

इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ चा आजचा दुसरा दिवस होता. आज सांगलीच्या संकेत सरगरने भारताला पहिले पदक जिंकून दिले. त्याने दोन फे-यांमध्ये ६ प्रयत्नांत पूर्ण ताकद पणाला लावली आणि एकूण २२८ किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले. पहिल्या फेरीत त्याने सर्वोत्तम ११३ किलो वजन उचलले. यानंतर त्याने दुस-या फेरीत म्हणजेच क्लीन अँड जर्कमध्ये १३५ वजन उचलून पदक जिंकले. गेल्या वर्षी चॅम्पियनशिपमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले होते.

वडिलांच्या पानटपरीवर काम करून संकेत शिकला
घरची बेताची परिस्थिती असल्याने संकेतचे वडील पानाची टपरी चालवायचे. त्याचबरोबर त्यांचे नाश्ता सेंटरही होते. संकेत वडिलांना मदत म्हणून दुकानावर बसायचा. वडिलांना शक्य तितकी मदत करायचा. होतकरू संकेतला पहिल्यापासून खेळाची आवड होती. वेटफिल्टिंगमध्ये त्याने योग्य ते प्रशिक्षण घेतले. घरच्यांनीदेखील संकेतला त्याच्या प्रयत्नांत साथ दिली. त्याच बळावर त्याने आपली घोडदौड सुरू ठेवली.

गुरुराजाने पटकावले कांस्य पदक
वेटलिफ्टिंगमध्ये भारताने आणखी एक पदक पटकावले असून, गुरुराजा पुजारीने बाजी मारत कांस्य पदकाला गवसणी घातली. पुजारीने पुरुषांच्या ६१ किलो वजनी गटात पदक जिंकले. गुरुराजा पुजारीने पहिल्या फेरीत ११८ स्कोअर केला, तर क्लिन अँड जर्कमध्ये त्याने १५८ स्कोअर केला. म्हणजेच त्याने एकूण २६९ इतका स्कोअर केला. पुजारीचे राष्ट्रकुलचे हे दुसरे पदक आहे. २०१८ च्या गोल्डकोस्ट गेम्समध्ये त्याने रौप्य पदक पटकावले होते.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या