उस्मानाबाद : शिवसेना नेते तथा उस्मानाबादचे माजी तालुकाप्रमुख दिलीप भगवान जावळे यांचे सोलापूर येथे उपचारादरम्यान रविवारी (दि.१७) सायंकाळी निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी दुपारी १ वाजता सांगवी (ता. उस्मानाबाद) येथे मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दिलीप जावळे यांनी विद्यार्थी दशेपासूनच शिवसैनिक म्हणून काम केले आहे. त्यांनी सांगवी गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य या पदावर काम करुन गावासह परिसरातील गोरगरिबांना सहकार्य केले आहे. त्यामुळे पक्षाकडूनही त्यांना शिवसेना उस्मानाबाद तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली होती. शिवाय ते पक्षाचे एकनिष्ठ नेते म्हणून त्यांची तालुकाभरात ओळख होती.
त्यांनी वयाच्या १८ वर्षापासून आजपर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान करून इतिहास केला आहे. दिलीप जावळे यांच्यावर सोलापूर येथे उपचार सुरु होते. यावेळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सांगवी, कामेगाव, समुद्रवाणी, घुगी, राजुरी, लासोना या गावामधून शोककळा व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर सोमवारी (दि.१८) दुपारी एक वाजता सांगवी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.