21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeउस्मानाबादपाण्यात वाहुन गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधण्यास प्रशासनास अपयश

पाण्यात वाहुन गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधण्यास प्रशासनास अपयश

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यात शुक्रवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे अचानक पूर आला. यामध्ये बोरखेडा व समुद्रवाणी शिवारातील ओढ्यामधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. यावेळी बोरखेडा ओढ्यातून कनगरा येथील युवक समीर युनूस शेख तर लासोना येथील रसाळ नामक व्यक्त समुद्रवाणी येथील ओढ्यातून वाहून गेला होता. यामध्ये कनगरा येथील युवकाचा मृतदेह रविवारी सापडला आहे. मात्र लासोना येथील मृतदेह तब्बल ४८ तासाच्या शोध मोहिमेनंतर मिळून आलेला नाही. त्यामुळे अखेर पथकास शोध मोहिम थांबवावी लागली असल्याचे उस्मानाबादचे तहसिलदार गणेश माळी यांनी दैनिक एकमशी बोलताना दिली.

उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी (आ.) महसूल मंडळात शुक्रवारी अचानक अतिवृष्टीचा पाऊस झाला. काही तासात १००.५ मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली. त्यामुळे या भागातील पाणी ओढ्यात न माईल्यामुळे पुलावरुन पाणी गेले. यावेळी वाहतूक ठप्प झाली. रात्री अंधार पडत असल्यामुळे अनेकजणांनी घर गाठण्यासाठी अशा पाण्यातून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये हे नागरिक पाण्यात वाहून गेले. त्यांना शोधण्यासाठी जिल्हा आपत्ती निवारण पथक, उस्मानाबाद अग्निशामक दल, जिल्हा पोलीस दल, तसेच ग्रामस्थांनी समीर याचा शोध शुक्रवारी रात्रीपासून सुरू केला होता. शनिवारी दिवसभर शोध घेतल्यानंतरही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. शनिवारी दुपारी ४ वाजता शोधकार्य संपवण्यात आले. परंतु समीरच्या नातेवाईकांनी त्याचा सतत तपास सुरूच ठेवला.

अखेर रविवारच्या पहाटे ६ वा. दुर्दैवाने समीरचा मृतदेह आढळला. समीरच्या काकांना सुरुवातीला मृतदेह दिसून आला. तेरणा नदीच्या पात्रात खोलीकरण केलेल्या ठिकाणी मृतदेह अडकून पडला होता. फुगून तो वर आल्यानंतर सर्वांना दिसून आला. बोरखेडा येथील ग्रामपंचायत सदस्य प्रेमनाथ पाटील यांनी तत्परता दाखवत घटनास्थळ गाठले. तेथे मृतदेह वाहून पुढे सरकत होता. सर्वांनी प्रयत्न करून मृतदेहाला काठावर आणले. घटनास्थळावरून मृतदेह सापडल्याची ठिकाण अर्धा किलोमीटर दूर आहे. पोलीस घटनास्थळावर दाखल होत असून मृतदेहाची उत्तरीय तपासणी व शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, कनगरा येथील उमदा युवक असलेला समीर असा अकाली जाण्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. समीरच्या प्रतीक्षेत त्याच्या कुटुंबियासह गावातील सर्वजण रात्रभर जागून होते.

दरम्यान समुद्रवाणी येथून तिघे जण वाहून गेले होते. यामध्ये कारमधून वाहून गेलेली दोघे लगेच पुरातून सुदैवाने बाहेर पडले. परंतु लासोना येथील रसाळ नावाचे गृहस्थ बेपत्ता आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पथकाने परिसरात तब्बल ४८ तास मोहिम राबविली मात्र रविवारी (दि.११) रात्रीपर्यंत मृतदेह आढळला नाही. त्यामुळे प्रशासनाने अखेर शोधमोहिम थांबवली असल्याची माहिती तहसिलदार गणेश माळी यांनी दिली. त्यामुळे प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतरही हा मृतदेह शोधण्यात अपयश आले आहे.

एअर इंडियाचे उड्डाण: नांदेड-अमृतसर-दिल्ली विमानसेवा ३ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या