आंबी : शेळगाव (ता. परंडा) येथे झालेल्या घरफोडीतील आरोपीला २४ तासांत पकडण्यात आंबी पोलिसांना यश आले आहे. आरोपीच्या ताब्यातून घरफोडीतील मालही हस्तगत केला आहे. पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. २२ मे रोजी रात्री साडेबारा ते एकच्या सुमारास परांडा तालुक्यातील शेळगाव येथे अभिमान प्रभाकर शेवाळे यांच्या घरी चोरी झाली होती. या प्रकरणी आंबी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीप्रमाणे माहिती घेऊन गुन्ह्यातील आरोपीकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला माल जप्त करण्यात आला. आंबी पोलिसांनी आरोपी अमोल अरूण जगताप (वय २४) रा. शेळगाव ता. परंडा यास अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमालही जप्त केला.
आरोपीला परंडा न्यायालयात पोलिस बंदोबस्तात हजर केले. आरोपीकडून एक हजार रुपये रोख (त्यात ५०० रूपयाच्या दोन नोटा), २५०० रुपयांचे चांदीचे ब्रासलेट (वजन ६.५ ग्रॅम) असा एकूण ३५०० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. गुन्ह्याचा तपास आंबी पोलिस ठाण्याचे पो.ना. एस.पी.शिंदे यांनी केला. ही कार्यवाही भूमचे उपविभागीय पोलिस अधिकारी डी.एस.डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक आशिष खांडेकर, पो.ना.एस.पी.शिंदे, पो.ना.सम्राट माने, पो.कॉ. सतीश राऊत यांच्या पथकाने केली.
२४ तासाच्या आत चोरटा मुद्देमालासह पकडल्यामुळे आंबी पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आरोपीला मुद्देमालासह पकडण्याची आंबी पोलिसांची या आठवड्यातील दुसरी कार्यवाही आहे.