36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeउस्मानाबादराज्य सरकारमध्ये कोणाचा कोणाला ताळमेळ लागेना

राज्य सरकारमध्ये कोणाचा कोणाला ताळमेळ लागेना

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : सध्याचे सरकार शाळा चालु करायच्या का नाही, विज बिले कमी करायचे का नाही, १०० युनिट मोफत द्यायचे का नाही, याबाबत गोंधळलेली आहे. निष्क्रीय व गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये कोणताही निर्णय घेत नसल्याचा सरकारवर आरोप केला. तर पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना १२ वर्षे मतदारांनी संधी दिली. मात्र त्यांनाही ठोस काहीच करता आलेले नाही. असा आरोप सतीश चव्हाण यांच्यावर केला.

मराठवाडा पदवीधर मतदार संघातील भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर शनिवार (दि. २१) उस्मानाबाद दौ-यावर आले होते. शहरातील हॉटेल समर्थ येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना आ.दरेकर म्हणाले, पदवीधर मतदार संघातून आ. सतीश चव्हाण यांना दोन वेळेस निवडून दिले. त्यामुळे त्यांना १२ वर्षे संधी मिळाली. त्यात ७ वर्षे सत्तेत कार्यकाळ राहिला. एकही ठळक काम झालेले नाही. विधीमंडळात मी स्वत: आहे. अनेक आमदार वेगवेगळ्या समस्या मांडतात. परंतू आमदार चव्हाण यांना त्या मांडता आलेल्या नाहीत. पदवीधर व बेरोजगारांची समस्या मांडली ना कांही विकासाचे प्रश्न मांडले. त्यामुळे त्यांची १२ वर्षांची कारकीर्द निष्क्रीय ठरली आहे. त्यामुळे भाजपाला या मतदार संघात संधी मिळणार आहे.

याउलट पदवीधर मतदार संघातून भाजपाचा उमेदवार निवडूण आल्यास आमचा दोन कलमी कार्यक्रम तयार आहे. जे पदवीधर नौकरीसाठी इच्छुक आहेत. त्यांना नौकरी मिळविण्यासाठी एक योजना तयार करण्यात आली आहे. तर जे पदवीधर स्वंयरोजगार अथवा उद्योग करू इच्छितात अशा बेरोजगार पदवीधरांसाठी शाश्वत कृती कार्यक्रम तयार करण्यात आला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्य सरकारवर टिका करताना आ. दरेकर म्हणाले, सध्याचे सरकार निष्क्रीय व गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये आहे. शाळा चालु करायच्या का नाही, विज बिले कमी करायचे का नाही, १०० युनिट मोफत द्यायचे का नाही, याबाबत सरकारची भुमिका गोंधळलेली आहे. ज्या वीज ग्राहकांनी वीज बिले भरलेली नाही, वीजबिले तपासून देण्यास सांगूनसुध्दा वीजग्राहकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.

ऊर्जामंत्री वीजबिलाची तपासणी करावी लागेल असे म्हणतात. त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा देऊन एमएससीबी कार्यालयात बिले तपासणीचे कामे करावे, असा टोलाही दरेकर यांनी लगावला. महाराष्ट्रात दुसरी लाट देत येत असताना शाळा सुरू करण्याची घोषणा मुंबई व ठाणे वगळता कांही जिल्हयात मंत्री करीत आहेत. तर कांही जिल्हयात कोरोनामुळे शाळा नको, असे सांगत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या ५ वर्षांच्या काळामध्ये अनेक गतीमान कामे झाली. निर्णय घेतले व त्यांची अंमलबजावणी करून दाखविली. त्यामुळे या सरकारच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. बिहार व अन्य राज्याच्या निवडणुकीत माध्यमांचा सर्व अंदाज खोटा ठरवून भाजपाला निवडून दिले आहे. त्यामुळे राज्यातील पाचही जागा भाजपाच्या निवडूण येतील, त्यात मराठवाडा मतदार संघ हा रेकॉर्डब्रेक मताने निवडूण येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, अ‍ॅड. व्यंकटराव गुंड, सुधीर पाटील, नितीन भोसले, इंद्रजित देवकते आदी उपस्थित होते.

यातला एक तरी ….काँग्रेसचा नेता होऊ शकेल?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या