उस्मानाबाद (सुभाष कदम) : जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या तेर (ता. उस्मानाबाद) गावात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने प्रशासनाने आतापर्यंत तेर गाव सहा वेळा (८४ दिवस) कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहे. पुन्हा रविवारी (दि. २७) सप्टेंबर रोजी प्रशासनाने आदेश काढून संपूर्ण तेर गाव १० ऑक्टोबरपर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहे. गेल्या एक महिन्यापासून गावातील किराणा दुकानासह बाजारपेठ पुर्णपणे बंद असून व्यापाèयांची उपासमार होत असल्याने त्यांची सहनशीलता संपली आहे. यापुढे गाव जरी कंटेनमेंट झोन असले तरी व्यापारी दुकाने उघडी ठेवणार आहेत. तशी मागणी ग्रामपंचायतीकडे करण्यात आली असून ग्रामपंचायत सकाळी १० ते सायंकाळी पर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, असा ठराव घेऊन प्रशासनाला देणार आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर हे जवळपास २० हजार लोकसंख्येचे गाव आहे. तेरजवळ असलेल्या बारा वाड्यांचा दैनंदिन व्यवहार तेर येथूनच होतो. त्यामुळे येथील बाजारपेठ मोठी असून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते. २२ मार्चपासून देशात लॉकडाऊन सुरू होता. त्या काळात तेरची बाजारपेठ बंद होती. राज्यात अनलॉक सुरू झाल्यापासून तेर गावची बाजारपेठ ठराविक वेळेत सुरू झाली. कालांतराने तेर गावात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने प्रशासनाने १४ दिवस संपूर्ण तेर गाव कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले.
मेडिकल दुकाने व भाजीपाला वगळता सर्व दुकाने या काळात बंद ठेवण्यात आली. नंतर ऑगष्ट महिन्यात कोरोना रुग्ण सापडले, तेव्हा पासून तेर गाव कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर आहे. ५ सप्टेंबर पासून तेर गावाची बाजारपेठ किराणा दुकानासह बंद आहे. केवळ भाजीपाला तोही घरोघरी फिरुन व मेडिकल दुकाने सुरू आहेत. तेर गावात आजअखेर २३८ कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यापैकी २०२ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. २९ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून आजपर्यंत ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. तेर गावातील रुग्ण संख्या दिवसागणिक वाढतच आहे. गावात शासकीय ग्रामीण रुग्णालय असल्याने या ठिकाणी स्वॅब घेण्याची व रॅपीट अॅन्टीजेन टेस्टची सुविधा असल्याने मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या होत आहेत.
त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णही मोठ्या संख्येने वाढतच आहेत. रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासन दर १४ दिवसांनी १४ दिवसाकरिता कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करीत आहे. गाव कंटेनमेंट झोन असल्याने व्यापा-यांना दुकाने उघडण्यास बंधने घालण्यात आली आहेत. एक महिन्यापासून व्यवसाय बंद असल्याने व ज्यांचे पोटच व्यवसायावर अवलंबून आहे, अशांची उपासमार होत आहे. शेतीतील कामे सुरू असल्याने शेतकरी, मजुरांचे बरे आहे. परंतू व्यापा-यांचे अवघड बनत चालले आहे. त्यामुळे व्यापा-यांनी यापुढे गाव जरी कंटेनमेंट झोन असले तरी दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे केली आहे.
ग्रामपंचायत सोमवारी (दि. २८) सप्टेंबर रोजी ठराव घेऊन सकाळी १० ते ५ या वेळेत दुकाने उघडण्यास प्रशासनाकडे परवानगी मागणार आहे. दरम्यान, दुकाने उघडण्यास परवानगी न मिळाल्यास व्यापारी आंदोलन करण्याच्या मानसिकतेत आहेत. ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून दुकाने उघडण्यास परवानगी द्या, अन्यथा नुकसान भरपाई द्या, अशी मागणी दुकानदार करणार आहेत. व्यापा-यांच्या पुढे प्रशासन झुकणार की कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करण्यावर ठाम राहणार हे दोन दिवसात कळणार आहे.
तेर गावात आतापर्यंत २३८ कोरोना रुग्ण
तेर गावची लोकसंख्या लोहारा, वाशी या तालुक्याच्या शहराएवढी मोठी आहे. गावची बाजारपेठही मोठी असल्याने गावात शेकडो व्यवसायिकांची लहान मोठी दुकाने आहेत. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने एक महिन्यापासून बाजारपेठ बंद आहे. आजअखेर गावात २३८ रुग्ण सापडले असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. कंटेनमेंट झोन असतानाही दुकाने सुरू ठेवण्यास प्रशासन परवानगी देणार की नाही याकडे व्यापा-यांचे लक्ष लागले आहे.
लुडो खेळताना मुलीला पराभूत केले; मुलीने वडिलांच्याविरुद्ध ठोकला दावा